November 2, 2024

पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत ब्रिलियंट, पूना क्लब संघांचा विजय

पुणे, 27 फेब्रुवारी 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब (14 वर्षांखालील) चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत ब्रिलियंट संघाने स्पार्क्स स्पोर्टिव्ह संघाचा तर पूना क्लब संघाने व्हिजडम संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

ब्रिलियंट क्रिकेट अकादमी मैदान येथे झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना ब्रिलियंट संघाने स्पार्क्स स्पोर्टिव्ह संघाचा 1 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना रुद्राक्ष जाधव व कृष्णा गायकवाड यांच्या अचूक गोलंदाजीने स्पार्क्स स्पोर्टिव्ह संघाचा डाव 37.5 षटकात सर्वबाद 173 धावांत रोखला. ध्रुविल रायथाथा याच्या नाबाद 59 धावांनी संघाच्या डावाला आकार दिला. 173 धावांचे लक्ष सार्थक ढमढरेच्या 31 व शिवरत्न सूर्यवंशीच्या 23 धावांसह ब्रिलियंट संघाने 40.2 षटकात 9 बाद 174धावांसह पुर्ण करत विजय मिळवला. 10 धावात 4 गडी बाद करणारा रुद्राक्ष जाधव सामनावीर ठरला.

अन्य लढतीत घरच्या मैदानावर खेळताना प्रणव शिंदेच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर पूना क्लब संघाने व्हिजडम संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
स्पार्क्स स्पोर्टिव्ह: 37.5 षटकात सर्वबाद 173 धावा(ध्रुविल रायथाथा नाबाद 59(78,8×4), तन्मय पाटील 37(39,4×4), रुद्राक्ष जाधव 4-10, कृष्णा गायकवाड 3-18) पराभूत वि ब्रिलियंट: 40.2 षटकात 9 बाद 174धावा (सार्थक ढमढेरे 31(32,7×4), शिवरत्न सूर्यवंशी 23(24,3×4,1×6), ध्रुविल रायठथा 4-42, अर्जुन माहुली 2-43) सामनावीर- रुद्राक्ष जाधव
ब्रिलियंट संघ 1 गडी राखून विजयी

व्हिजडम: 27.2 षटकांत सर्वबाद 72 (प्रथमेश कचरे 11, प्रणव शिंदे 4-27, शिव चैनानी 2-7) पराभूत वि पूना क्लब: 16 षटकांत 2 बाद 74 धावा(अवधूत हरवडे नाबाद 21(32,5×4), वीर जैन नाबाद 19), जयेश जोशी 2-26) सामनावीर- प्रणव शिंदे
पूना क्लब संघ 8 गडी राखून विजयी