July 24, 2024

३३ वी राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धा : पुरुष फॉइल सांघिक आणि पुरुष ईपी वैयक्तिक प्रकारात एसएससीबी खेळाडूंचे वर्चस्व

पुणे, दि. २७ मार्च २०२३ पुण्यात संपन्न होत असलेल्या ३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत पुरुष फॉइल प्रकारात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (एसएससीबी) संघाने मणिपूर संघाचा ४५-३२ गुणांनी पराभव करत, सुवर्णपदक पटकाविले. तर एसएससीबीच्या भूपेन सिंग लिशम याने सुनील कुमार (एसएससीबी)  याच्यावर ( १५-११) अशी मात करत, वरिष्ठ पुरुष ईपी प्रकारात सुवर्णपदक मिळविले.
भारतीय तलवारबाजी महासंघातर्फे महाराष्ट्र तलवारबाजी महासंघ व डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, आकुर्डी, पुणे’च्या सहकार्याने पुण्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २५ ते २८ मार्च या कालावधीत महाळुंगे–बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये संपन्न होत आहे. स्पर्धेतअंतर्गत पुरुष फॉइल (सांघिक ) आणि पुरुष इपी (वैयक्तिक) सामने संपन्न झाले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सह-संचालक चंद्रकांत कांबळे, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर, क्रीडा अधिकारी गीता साखरे, भारतीय तलवारबाजी संघाचे ज्येष्ठ सल्लागार अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी संघाचे सचिव उदय डोंगरे, कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे हे उपस्थित होते.

स्पर्धेत पुरुष फॉइल सांघिक प्रकरात अंतिम फेरीमध्ये एसएससीबी विरूध्द मणिपूर संघ असा सामना रंगला. एसएससीबी संघात अर्जुन, कॅथिरेसन बिबिश, खान मोहम्मद इस्माइल आणि ठोकचोम बिकी यांचा तर मणिपूर संघात अभिनाश कंगाबम, खोइसनाम राजीव, नंदीबाम तुफान, सनासम हेमाश यांचा समवेश होता. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीमध्ये एसएससीबी संघाने महाराष्ट्र संघाचा ४५-२९ गुणांनी पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत मणिपूर संघाने छत्तीसगढ संघावर ४५-३९ गुणांनी मात करत, अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

वरिष्ठ पुरुष ईपी प्रकारात २२ वर्षीय भूपेन सिंघ लिशम यांनी अंतिम फेरीत सुनील कुमार यांच्यावर १५-११ अशी मात करत, सुवर्णपदक मिळविले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत भूपेन सिंघ लिशाम याने छत्तीसगढच्या आरएस शेरजिन याचा १५- १० गुणांनी पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत सुनील कुमार याने मध्य प्रदेशाच्या शंकर पांडेयवर १५-१० अशी मात केली.

* फेरीनिहाय निकाल
पुरुष फॉइल ( सांघिक )

अंतिम फेरी
एसएससीबी वि. वि. मणिपूर (४५-३२)

उपांत्य फेरी
एसएससीबी वि. वि. महाराष्ट्र ( ४५-२९)
मणिपूर  वि. वि. छत्तीसगढ ( ४५-३९)

वरिष्ठ पुरुष इपी वैयक्तिक:

अंतिम फेरी:
भूपेन सिंग लिशम वि. वि. सुनील कुमार  (१५-११)

उपांत्य फेरी:
भूपेन सिंग लिशम वि. वि.आरएस शेरजिनचा (१५-१०)
सुनील कुमार वि. वि.शंकर पांडे (१५-१०)