July 24, 2024

व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष व महिला संघ विजेते

पुणे, 28 मार्च 2023- महाराष्ट्राच्या पुरुष अ संघाने तसेच महाराष्ट्राच्या महिला ब संघाने येथे पार पडलेल्या व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. महाराष्ट्राच्या पुरुष अ संघाने महाराष्ट्राच्या ब संघाचा 26-17 असा तर महिला ब संघाने महाराष्ट्राच्या अ संघाचा 17-11 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. 
 
महाराष्ट्र व्हीलचेअर बास्केटबॉल संघटनेने पीवायसी हिंदू जिमखाना कोर्टवर 25 व 26 मार्च या कालावधीत ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पुणे, मुंबई व अमरावती तसेच खडकी येथील पॅराप्लेजीक रिहॅब सेंटरमधील (पीआरसी) येथील खेळाडूंचा सहभाग होता. पुरुष गटात तीन तर महिला गटात दोन संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. महाराष्ट्राचे पुरुष गटात अ, ब आणि क तर महिला गटात अ आणि ब असे दोन संघ खेळले. साखळी तसेच बाद फेरीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्र अ संघाने क संघाचा 33-15, तर महाराष्ट्र ब संघाने महाराष्ट्र क संघाचा 20-15 असा पराभव केला. 
 
या स्पर्धेतील काही निवडक खेळाडू महाराष्ट्राच्या व्हीलचेअर बास्केटबॉल राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना दिसतील. या स्पर्धेत भारतीय व्हीलचेअर बास्केटबॉल संघाचे प्रख्यात खेळाडू सुरेश कारकी, एमडी फय्याज आलम, एनएस थापा, सुधांशु पटेल तसेच महिला संघातील खेळाडू गीता चौहान, मीनाक्षी जाधव व निशा गुप्ता या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून अतिरीक्त पोलीस महासंघाचलक आयपीएस अधिकारी सुनील रामानंद, कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड उपस्थित होते. यावेळी पीआरसीचे वैद्यकीय संचालक कर्नल आर. के. मुखर्जी, गार्डियन कार्पोरेशनचे अध्यक्ष मनिष साबडे, वर्धमान मेडीट्रेडचे संचालक जीतेंद्र पितलिया, सिमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीकृष्ण हतंगडी, पीवायसीचे सचिव सारंग लागू, पीवायसीचे बास्केटबॉल विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे व राजीव वाखले आदी उपस्थित होते. स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी पीवायसी क्‍लब तसेच व्हीलचेअर बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न चौधरी, सदस्य अब्राहम पौलुसे, कॅप्टन लुइस जॉर्ज मेपार्थ, सुवर्णा लिमये, मेघना मुनोत, भारतीय बास्केटबॉल संघाची कर्णधार शिरीन लिमये, जस्टीन व दीनेश गांधी यांनी संपूर्ण सहकार्य केले.