May 12, 2024

५३ वर्षीय मेंदू मृत व्यक्तीच्या अवयवदानातून डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे वाचले तीन जणांचे जीव

पुणे, २० सप्टेंबर २०२३: डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे दाखल झालेल्या एका ५३ वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे तीन जणांचे जीव वाचवण्यात आले. नरेंद्र नायडू (नाव बदलले आहे) या रुग्णाला मेंदू मध्ये रक्तस्त्राव होत होता आणि त्याला १४ सप्टेंबर २०२३ रोजी वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करूनही, रुग्ण वाचू शकला नाही आणि १८ सप्टेंबर रोजी त्यांना मेंदू मृत घोषित करण्यात आले. समुपदेशनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

रुग्णाच्या कुटुंबाकडून संमती मिळाल्यावर यकृत, दोन मूत्रपिंड आणि दोन नेत्रपटल दान करण्यात आले. डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे एका ५५ वर्षीय रुग्णाला यकृत आणि ३३ वर्षीय रुग्णाला एक किडनी प्रत्यारोपित करण्यात आली. आणि दूसरी किडनी पुण्यातील एका रुग्णालयाला देण्यात आली. गरजूंसाठी नेत्रपटल दान करण्यात आले.

वरील सर्व अवयव दान पुणे आणि महाराष्ट्र विभागाच्या राज्य वाटप धोरणानुसार करण्यात आले.

डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाल्या “अवयव दान आणि प्रत्यारोपण हे वैयक्तिकरित्या माझे आवडते क्षेत्र आहेत, कारण ते जीव वाचवण्याचा शेवटचा उपाय आहेत. अवयव दान आणि प्रत्यारोपणाच्या माध्यमातून जीवन वाचवणाऱ्या आमच्या डॉक्टरांच्या टीमचा अभिमान आहे. अवयव दान आणि त्यामुळे वाचवता येणारे जीवन याबद्दल जागरूकता पसरवणे हेच माझे उद्दिष्ट आहे.”

याप्रसंगी बोलताना डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाले की, “या उदात्त कृत्याबद्दल मी रुग्णाच्या कुटुंबाचे मनापासून आभार मानतो. अनेक गुंतागुंतीचे अवयव प्रत्यारोपण आणि शस्त्रक्रिया करायला मिळणे हे आमच्यासाठी सन्मानाचा क्षण आहे. यासाठी मी आमच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीमचे अभिनंदन करतो”

डॉ. मनीषा करमरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, म्हणाल्या “आम्ही भारतातील यशस्वी बहु-अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये आघाडीवर आहोत. आमच्या सक्षम अवयव प्रत्यारोपण तज्ञांनी गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सशक्त रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनासह, आम्ही आमच्या रुग्णांसाठी नवीनतम जागतिक दर्जाची वैद्यकीय उपकरणे आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

डॉ. वृषाली पाटील, कार्यक्रम संचालिका आणि विभाग प्रमुख, मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जरी, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे म्हणाल्या, “अवयव दान करून तीन व्यक्तींना जीवन दान दिल्या बद्दल मी त्या कुटुंबातील सदस्यांची आभारी आहे. अवयव दात्याच्या या मानवतेच्या कृतीमुळे अनेक रुग्णांचा जीव वाचला आहे. प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांच्या प्रकृती सुधारत आहे..”