May 20, 2024

पुणे: लोकसभा निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी, कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांनाही सुट्टी असणार

पुणे, दि. ११/०५/२०२४: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ ची निवडणूक प्रक्रिया सुरू असून मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार असल्याने या दिवशी संबंधित मतदार संघात सुट्टी असणार आहे.

राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार ही सार्वजनिक सुट्टी संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असणार आहे. तसेच राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर संस्था (प्रतिष्ठान) आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावावे आणि लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.