May 20, 2024

लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका पारदर्शक वातारणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे, 11 मे 2024: जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदासंघाकरीता सोमवार १३ मे रोजी मतदान होत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून या निवडणूका पारदर्शक वातारणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर उपस्थित होत्या.

श्री. दिवसे म्हणाले, मतदारांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उन्हाळा असल्याने सावलीसाठी शेड, मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, रांगेत गर्दी झाल्यास बसण्यासाठी बेंचेस, खुर्च्या, प्रतिक्षालय, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा, वयोवृद्ध नागरिक आणि दिव्यांगासाठी व्हीलचेअर आदी विषेश सोयी सुविधा, मतदारांच्या वाहनांसाठी पार्किंग इत्यादी सुविधांबरोबरच शाळेच्या खोल्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात २८ एप्रिलपासून ६८ लाख ७३ हजार मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत विशेष सभेचे आयोजन करून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. त्याचबरोबर नवमतदार नोंदणीसाठी नमुना क्रमांक ६ भरून घेण्यात आले आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघात १२ डी अर्ज भरलेल्या ४६३ पैकी ४४० ज्येष्ठ नागरिक, ४२ पैकी ४१ दिव्यांग नागरिक तसेच शिरुर लोकसभा मतदारसंघात ३८१ पैकी ३५१ ज्येष्ठ नागरिक, ८७ पैकी ८४ दिव्यांग नागरिक आणि मावळ लोकसभा मतदारसंघात २६३ पैकी २४५ ज्येष्ठ नागरिक व ४५ पैकी ४० दिव्यांग नागरिकांनी घरुनच टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात १० व मावळ लोकसभा मतदारसंघात ३ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे.

जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्ह्यात नोकरीनिमित्त नागरिकांचे स्थलांतर, बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेत १५ तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेल ८ मदतकक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. या कक्षांच्या माध्यमातून मतदार यादीत नाव नसलेल्यांकडून नमुना क्रमांक ६ भरून घेतले आहेत. हे मदत कक्ष १३ मे पर्यंत सुरू राहतील. पुणे शहरात ५ पेक्षा जास्त मतदानकेंद्र असणाऱ्या ५१० इमारती आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात एकूण ५ हजार ६४१आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघात ८ हजार ८ असे गृहनिर्माण संस्थेतील मतदार आहेत.

संवेदनशील मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची तयारी झाली आहे. साहित्याचे वितरण आणि स्वीकृतीचे योग्यप्रकारे नियोजन केले असून कर्मचारी, साहित्य वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आचार संहितेच्या कालावधीत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सी-व्हिजील ॲपवर १ हजार ५०५ तक्रारी प्राप्त झाल्या असून तथ्य आढळलेल्या १ हजार ३२९ तक्रारीवर कार्यवाही करण्यात आली आहे. माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने १०० पेक्षा जास्त जाहिरातींचे प्रमाणिकरण केले आहे. समाजमाध्यमांवर प्रमाणीकरण न करता सुरू असलेल्या 35 पेक्षा अधिक उमेदवारांना नोटीस देण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रावर केवळ याच व्यक्तींना प्रवेश
मतदान केंद्रासाठी ठरवून दिलेल्या मतदारांव्यतिरिक्त मतदान अधिकारी, प्रत्येक उमेदवार, त्याचा निवडणूक प्रतिनिधी व प्रत्येक उमेदवाराचा यथोचित्तरित्या नियुक्त केलेला एकावेळी एकच मतदान प्रतिनिधी, भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या प्रसार माध्यमातील व्यक्ती, महत्त्वाचे, संवेदनाक्षम मतदान केंद्र असल्यास त्याठिकाणी सूक्ष्म निरीक्षक, व्हिडीओ ग्राफर, छायाचित्रकार, वेब कास्टिंग करणारा कर्मचारी वर्ग, मतदाराबरोबर असलेले लहान बाळ, अंध किंवा आधाराशिवाय चालू न शकणाऱ्या दिव्यांग मतदारांबरोबर असलेली व्यक्ती, मतदारांची ओळख पटण्यासाठी किंवा मतदान करून घेण्याच्या कामी मतदान केंद्राध्यक्ष यांना अन्य प्रकारे सहाय्य करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष वेळोवेळी ज्यांना प्रवेश देतील अशा व्यक्तींनाच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.

दिव्यांग व वयोवृद्धांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा
दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन व्हील चेअर ठेवण्यात येणार आहेत. वयोवृद्धव दिव्यांग मतदारांना रांगेत उभे न करता त्यांना मतदानासाठी सहकार्य करण्यात येईल. मतदान केंद्रावर येणे शक्य नसल्यास त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल.

निवडणुकीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था
जिल्ह्यात संवेदनशील मतदान केंद्रावर २४x७ एकात्मिक नियंत्रण कक्ष, संवेदनशील बुथमध्ये वेबकास्टींग, पुरेसा सशस्त्र पोलीस बंदोबस्त, प्रतिबंधात्मक कार्यवाही, संपूर्ण जिल्ह्यात चेक पोस्टचे जाळे आणि सूक्ष्म निरीक्षक तैनात करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. मतदान केंद्रापासून १०० मीटर परिघात मतदारांना मोबाईल नेता येणार नाही. मतदान केंद्रात छायाचित्र, छायाचित्रण करण्यास प्रतिबंध आहे. असे प्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. मावळ, पुणे, शिरूर या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवून मतदान करावे, लोकशाही मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी यावेळी केले.