July 24, 2024

पीवायसी चेस लीग स्पर्धेत ५५ खेळाडूंचा सहभाग

पुणे, 30 जून 2023- पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पीवायसी चेस लीग स्पर्धेत ५५ खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. १ व २ जुलै २०२३ रोजी पीवायसी जिमखाना येथील बुद्धिबळ संकुलात ही स्पर्धा रंगणार आहे.
आम्ही पीवायसी हिंदू जिमखाना येथे विविध क्रीडाप्रकारांच्या लीग स्पर्धा आयोजित करीत असतो. परंतु आम्ही पहिल्यांदाच सभासदांसाठी बुद्धिबळ लीग स्पर्धा आयोजित करीत आहोत, असे पीवायसीचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे यांनी सांगितले.
क्लबचे सचिव सारंग लागू म्हणाले, की आम्ही याआधी क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल व कॅरम लीग स्पर्धा आयोजित केल्या आहेत. आम्ही सभासदांचे आरोग्य व मनोरंजनासाठी विविध प्रकारे प्रयत्न करीत असतो. चेस लीगमुळे सभासदांना एका व्यासपीठावर येण्यास, तसेच बुद्धिबळासारख्या खेळाच्या माध्यमातून परस्पर नातेसंबंध दृढ होण्यास साहाय्य होणार आहे. स्पर्धेला रिअल्टी सेव्हनचे कपिल त्रिमल यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
पुढे माहिती देताना चेस विभागाचे सचिव श्री शिरीष साठे म्हणाले की या लीगमध्ये सात संघ भाग घेणार आहेत संघांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: १) गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स (मालक अनिल छाजेड), किंग्ज ६४ ( मालक प्रवीण भालेराव), मराठा वॉरियर्स (मालक शिरीष गांधी), नॉक ९९ नेव्हिगेटर्स (आशिष देसाई), वाडेश्वर विझार्ड्स (स्वानंद भावे), ७ नाईट्स (मालक कपिल त्रिमल ), व गोल्डन किंग्ज (निरंजन गोडबोले).
लिलावात सर्वाधिक किंमत व पसंती मिळालेले खेळाडू असे आहेत- परम जालन (मराठा वॉरियर्स ४६००० रु.), रोहित देवल (किंग्ज ६४ – ४५००० रु.), निखिल चितळे (नॉक ९९ नेव्हिगेटर्स ४१,००० रु.) आणि विजय ओगले (गोल्डफिल्ड ट्रायडेन्ट्स ३७,०००रु.) स्पर्धेचे नियम-
१) सात सामन्यांच्या राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये सहा पटांवर स्पर्धा होईल.
२) पट क्र. १, ३ व ५ वर पांढरी मोहरी घेऊन खेळणारा संघ पट क्र. २, ४, ६ वर काळी मोहरी घेऊन खेळेल. तर प्रतिस्पर्धी संघ पट क्र. १, ३, ५ वर काळी मोहरी घेऊन आणि पट क्र. २, ४, ६ वर पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळेल.
३) लीग स्पर्धेतील दोन सर्वोत्तम संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. पांढरी व काळी मोहरी नाणेफेकीने निश्चित होतील.
४) डावाची वेळ १५ मिनिटे (+ प्रत्येक चालीला १० सेकंद)
स्पर्धेच्या संयोजन समितीत आमोद प्रधान, शिरीष साठे यांचा समावेश आहे.