July 24, 2024

पुणे: दिवेघाटात योग साधकांकडून हजारो वारकऱ्यांच्या पायांना मसाज

पुणे, १४/०६/२०२३: दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवते. पुणे ते सासवड हा लांबचा टप्पा पार करताना अवघड अशी दिवेघाटाची वाट चढून आल्यावर दमलेल्या पायांना योग साधकांकडून तिळाच्या तेलाने मसाज करून त्यांच्यात चैतन्य भरण्याचे काम होते. या आगळ्यावेगळ्या मसाज सेवेने वारकरी सुखावतात व उत्साहाने पुढे मार्गस्थ होतात.

योग विद्याधाम पिंपरी चिंचवडतर्फे शास्त्रशुद्ध पद्धतीने योगसाधक मसाज करुन देतात. एकावेळी साधारण ५० महिला व ५० पुरुष वारकऱ्यांचा मसाज होतो. यंदा या वारीत सहा ते सात हजार वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगगुरू प्रमोद निफाडकर आणि निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुरेश केकाने, ऐश्वर्या जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारकरी मसाज सेवा गेल्या ९ वर्षापासून सुरू आहे.

प्रमोद निफाडकर म्हणाले, “शेकडो किलोमीटरची पायी वारी करताना पाय थकतात. अशावेळी वारकऱ्यांच्या पायांना मसाज करून देण्याची संकल्पना आमच्या कार्यकर्त्यांनी मांडली आणि हा उपक्रम सुरु झाला. पुणे-सासवड हा लांबचा पल्ला; त्यातही दिवेघाटाची अवघड वाट चालून वर आल्यावर मन आनंदी असले, तरी पायांना थकवा येतो. मसाज करून पाय मोकळे करावेत आणि मानसोबत पायही त्याच आनंदाने पुढे चालावे, या उद्देशाने ही सेवा देत आहोत. पांडुरंगाची चरणसेवा केल्याची अनुभूती आम्हाला मिळते.”

सुरेश केकाणे म्हणाले, “शंभर ते दीडशे योगसाधक ही सेवा देतात. वारकऱ्यांना यातून सुखद आनंद मिळतो. वारीत पाण्यासह भोजन, औषधे, खाद्यपदार्थ व अन्य गोष्टी मिळतात. पण अशी अनोखी सेवा दिवेघाटातून वर आल्यावर मिळते, असे वारकरी आवर्जून नमूद करतात.”

ऐश्वर्या जोशी म्हणाल्या, “वारकऱ्यांच्या पायांना मसाज करून सेवेचा निखळ आनंद आम्ही घेतो. हजारो माउलींच्या पायांना मसाज करण्याचा हा आनंद आम्हाला शेवटपर्यंत घेता यावा, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो.”