April 13, 2024

लोहगाव विमानतळ परिसरात तरुणीचा विनयभंग, लष्करी जवानास अटक

पुणे, ०४/०७/२०२३: लोहगाव विमानतळ परिसरात तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन लष्करी जवानास पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणी गणेश अशोक साळुंखे (वय ३२, रा. आंबावडे, ता. कोरेगाव, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी लोहगाव विमानतळ परिसरात ॲप आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीची वाट पाहत थांबली होती. त्या वेळी आरोपी साळुंखे तेथे आला. त्याने तरुणीकडे संपर्क साधण्यासाठी मोबाइल संच मागितला. मोबाइल संच मागण्याच्या बहाण्याने साळुंखेने तरुणीशी अश्लील वर्तन केले.

तरुणीने आरडाओरडा केला. साळुंखेला विमानतळ परिसरात बंदोबस्तास असलेल्या जवानांनी ताब्यात घेतले. विनयभंग केल्याच्या आरोपावरुन साळुंखेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक वाकडे तपास करत आहेत. साळुंखे सीमा सुरक्षा दलात (बाॅर्डर सिक्युरिटी फोर्स) नियुक्तीस असल्याची माहिती पोलिसांनी दिली.