June 22, 2025

कलेमध्ये रसिकांना आनंद आणि संदेश देण्याचे सामर्थ्य – खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

पुणे, दि. १० जून, २०२५ : “कलेमध्ये विशेषतः चित्रकलेमध्ये एकाचवेळी रसिकांना आनंद आणि संदेश देण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे स्वतःमधील तसेच मुलांमधील कलागुण पारखून पालकांनी ते जोपासले पाहिजेत, कलाबीजाला खतपाणी घालत राहिले पाहिजे”, असा सल्ला राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिला. व्हीनस कला महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी ज्येष्ठ चित्रकार प्रा. सुधाकर चव्हाण, सुभाष पवार, प्रमोद कांबळे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे, महोत्सवाचे आयोजक सुरेंद्र करमचंदानी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सुप्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांना मानवंदना देण्याच्या उद्देशाने त्यांची स्वाक्षरी असलेल्या व्हिंटेज पेनच्या सिग्नेचर एडिशनचे अनावरणही याप्रसंगी दीपप्रज्ज्वलनासोबत मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. व्हीनस ट्रेडर्सच्या ५१ व्या वर्षपूर्तीनिमित्त सदर कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

पु ल देशपांडे यांची स्वाक्षरी असलेले हे व्हिंटेज पेन रोलर आणि फाउंटन पेन या प्रकारात उपलब्ध असून पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणेच कलात्मक कारागिरीसह विंटेज सौंदर्यशास्त्राचे मिश्रण यामध्ये पहायला मिळेल. हे पेन हाताने घडविलेले असून विशेषतः क्युरेट केलेल्या इटालियन रेझिनपासून समृद्ध असलेल्या तपकिरी आणि हस्तिदंती टोनमध्ये वठविलेले आहेत. या पेनांची नीब ही जर्मन श्मिट या प्रकारातील असून याद्वारे लिहिण्याचा आनंददायी अनुभव मिळू शकणार आहे. जुन्या काळातील सुंदरतेचे दर्शन या पेन च्या डिझाईन मधून घडते. सदर पेनची एडिशन ही विंटेज असून असे केवळ २५० पेन बनविण्यात आले आहेत.

या महोत्सवानिमित्ताने एकाच छताखाली कलेचा मनमुराद आस्वाद घेण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. १० ते १५ जून दरम्यान घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे आयोजित व्हीनस कला महोत्सवात कला प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, अनेकविध कार्यशाळा यांचे रेलचेल आहे. महोत्सवाचे हे ११ वे वर्ष असून सकाळी ११ ते सायं ७ पर्यंत ते सर्वांसाठी प्रदर्शन विनामूल्य खुले राहणार आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “या कला महोत्सवाच्या आणि प्रदर्शन तसेच स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित, हौशी, विद्यार्थी, प्रौढ कलाकारांना कलेच्या अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मूळात चित्र काढता येणे हा ईश्वरदत्त पुरस्कारच आहे. चित्रे रंग, रेषा, आकारांच्या भाषेतून, लेखणीतून संवाद साधतात. या प्रदर्शनातील चित्रे भावना व्यक्त करणारी आहेत. ती बोलकी आहेत. आजच्या मोबाईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात वावरताना पालकांनी विद्यार्थ्यांमधील हे कलागुण जोपासले पाहिजेत, त्यांना खतपाणी घातले पाहिजे. कलाबीज कोमेजता कामा नये. कलेच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध झाले आहे, पालकांनी प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचे काम करावे”, असेही त्या म्हणाल्या.

प्रा. सुधाकर चव्हाण म्हणाले, “हा कला महोत्सव हा अतिशय उत्तम उपक्रम सुरू आहे. या कलामहोत्सवात छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी काहीतरी आहे, हे कौतुकास्पद आहे”.

सुभाष पवार म्हणाले, “महोत्सवाचे आयोजक हेच कलासक्त रसिक व्यक्ती आहेत. त्यामुळेच अशा प्रकारचे उपक्रम ते कायमच यशस्वी करतात”. करमचंदानी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कला प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.