June 22, 2025

जयंत पाटील अपयशाला वैतागले; प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची व्यक्त केली इच्छा

पुणे, १० जून २०२५ : विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा दारून परभाव झाला. आगामी निवडणुकीत विजयाची संधीची शक्यता नाही. त्यामुळे वैतागलेल्या जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा, तरुणांना संधी द्यावे असे सांगत राजीनाम्याची तयारी दाखवली आहे.

त्यावर आता जेष्ठ नेते शरद पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचे ८ खासदार निवडून आले. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ १० आमदार निवडुन आले आहेत. त्यातीलही निम्मे आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले पाहिजे या भूमिकेचे आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात असताना त्यासाठी पाटिल हे फारसे अनुकूल नाहीत. त्यातच निवडणुकीत वारंवार पराभव होत आहेत. त्यामुळेच जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त करून हे पद नव्या पदाधिकार्याच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काय म्हणाले जयंत पाटील …
‘मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांच्या आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे.’