June 22, 2025

पुणे: शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याच्या शक्यतांवर अद्याप निर्णय नाही, पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रित: जयंत पाटील

पुणे, ९ जून २०२५: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दोन्ही “पवार” एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की सदर विषयाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाहीये.

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ‘उस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेचा (Al) वापर’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

ते पुढे म्हणाले, “काही चॅनल मी अज्ञात वासात गेलो असल्याचं सांगत आहेत. अज्ञात वासात जायचं प्रश्न नाही. आम्ही आमच पक्ष राज्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.” विधानसभा निवडणुकीत जे अनुभव आले त्यातून पक्ष सुधारण्याचे काम आम्ही करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. “लग्नकार्य तसेच पाऊस कमी झाल्यावर आम्ही राज्यभर फिरून पक्ष वाढवण्याचं काम करू,” असे यावेळी जयंत पाटील म्हणाले.

ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत जी काही चर्चा सुरू आहे याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की त्यांनाही प्रसार माध्यमांनी एकत्र केलं आहे. “ते दोघे एकत्र येतील की नाही याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. तसेच जे कोणी सोबत येतील त्यांना एकत्रीत घेऊन पुढे जाण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. हा शिवसेनेचा निर्णय असून त्यांनी जर इच्छा दाखवली तर त्यांना महाविकास आघाडी मध्ये सामील करतील. तसेच राज ठाकरे प्रभावी नेते असून त्यांच्या येण्याने जर राजकीय ताकद वाढत असेल तर चांगली गोष्ट आहे,” असे यावेळी जयंत पाटील म्हणाले.

उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच वर्धापन दिन पुण्यात साजरा होत आहे. याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात साजरा होत आहे. “मागच्या वर्षी अहिल्यानगर येथे वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता तेव्हा प्रचंड पाऊस अनुभवायला पाहायला मिळाला होता. यावर्षी पाऊसाचा अंदाज पाहून पुण्यात वर्धापन दिन आयोजित करण्यात आला आहे,” असे यावेळी जयंत पाटील म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बाबत जयंत पाटील यांना विचारल असता ते महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी जयंत पाटील‌ यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांनी जो लेख लिहिला आहे त्याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की राहुल गांधी यांनी जो लेख लिहिला आहे त्याला निवडणूक आयोगाने उत्तर देणे अपेक्षित आहे. पण भारतीय जनता पक्ष त्यांना उत्तर देत आहे. “भाजपवर कोणताही आरोप नसून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाचे प्रवक्ते भाजपचे नेते व्हायला लागले आहेत,” असा टोला यावेळी जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.