June 14, 2024

पुण्याचे माजी विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर लिखित ‘अटल- अविचल’ या आत्मकथेचे प्रकाशन संपन्न

पुणे, दि. ७ मे, २०२३ : पुण्याचे माजी विभागीय आयुक्त व निवृत्त सनदी अधिकारी डॉ दिपक म्हैसेकर लिखित ‘अटल- अविचल’ या आत्मकथेचे प्रकाशन विद्यमान खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. बीएमसीसी रस्त्यावरील गोखले इन्स्टिट्यूट येथील काळे सभागृहात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मनोविकास प्रकाशनच्या वतीने ‘अटल अविचल’ ही आत्मकथा प्रकाशित करण्यात आली आहे. माजी आमदार उल्हास पवार, निवृत्त सनदी अधिकारी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष असलेले लक्ष्मीकांत देशमुख व भारत सासणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना घेराव घालणारा विद्यार्थी ते मुख्यमंत्र्यांचा सल्लागार असा डॉ दिपक म्हैसेकर यांचा रोमांचकारी व प्रेरक प्रवास ‘अटल- अविचल’ या आत्मकथेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले, “सनदी अधिकारी हा सेवेमध्ये असताना त्या ठिकाणी ‘सेवा’ असते, ‘मेवा’ असतो आणि जेव्हा तिथे डॉ. दिपक म्हैसेकर यांसारखे अधिकारी असतात तेव्हा त्यांचा ‘हेवा’ आम्हाला वाटतो. अधिकारी असताना प्रत्येकाने सामान्य माणसाला भेटायला हवे. तसे केले तरच तुम्ही लोकप्रिय होऊ शकता. तुम्ही भेटायला आलेल्या माणसाला बसा जरी म्हणालात तरी तो खूश होऊन जातो. यातचं तो समर्पणाचा भाव आला. एक प्रशासकीय अधिकारी अनेक नकारात्मक गोष्टी टाळून सकारात्मक गोष्टी घडवू शकतो.”

आज स्पर्धा परीक्षेसाठी तयारी कशी करावी यासंदर्भात अनेक पुस्तके आहेत, मात्र अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर कसे काम करावे याबद्दल सांगणारी पुस्तकेच नाहीत हे लक्षात घेत पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला. आज समाजात नकारात्मकता खूप वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत सकारात्मकता यावी व सनदी अधिकारी म्हणून काम करताना कोणत्या व कशा परिस्थितीचा मला सामना करावा लागला, मी कसे काम केले यांचे विवेचन या पुस्तकात केले आहे असे सांगत डॉ दिपक म्हैसेकर म्हणाले, “३०-३२ वर्षे तत्त्वाशी तडजोड न करता मी काम केले. कुठलीही टोकाची भूमिका न घेता अनेकवेळा लांब उडी घेण्यासाठी माघार घेतली.” आज भारतात अमेरिकेसारखी ‘कमिटेड ब्युरोक्रसी’ दुर्दैवाने पहायला मिळत आहे. हे लोकशाहीसाठी घातक असून यावर मार्ग काढायला हवा असेही डॉ म्हैसेकर म्हणाले.

“कोविड काळ हा वेगळा होता. कोविड समजवून घेत असताना मी दिवसभराच्या कामानंतर रात्री वाचन करायचो, माहिती जमा करायचो. यावेळी रात्री- अपरात्री मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा करायचो. ते तेव्हाही प्रतिसाद द्यायचे. पुढे मी निवृत्त झाल्यावर तुम्ही कोविड काळात एक पाऊल पुढे टाकत जे काम केलं ते असच पुढे करत राहावं म्हणून मी तुम्हाला माझा सल्लागार म्हणून नेमणूक करतोय असे उद्धव ठाकरे म्हणाले आणि त्यांनी मला मुख्यमंत्र्यांचा सल्लागार म्हणून नियुक्त केले अशी आठवण डॉ म्हैसेकर यांनी सांगितली.

गेल्या काही वर्षांत भारतीय लोकशाहीची वाटचाल ही सर्व क्षेत्रात खालावत चालली आहेत. लोकशाहीचे सर्व स्तंभ खिळखिळे झालेले आहेत. गुणात्मक लोकशाही पेक्षा संख्यात्मक लोकशाही आज भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात होत आहे ही शोकांतिका असल्याचे उल्हास पवार यांनी सांगितले.

आपली लोकशाही ही आज प्रगल्भ राहिली नाही. यासाठी लोकशाहीचे सर्वच स्तंभ दोषी आहेत. त्यातही चीन रशिया सारखी ‘कमिटेड ब्युरोक्रसी’ आज आपल्या देशात वाढत आहे. ही वाटचाल चुकीच्या दिशेने होत असताना डॉ दिपक म्हैसेकर यांचे आत्मकथन मार्गदर्शक ठरते असेही पवार यांनी नमूद केले.

प्रशासकीय सेवेत चांगले अधिकारी कमी का असतात हे आज समजून घेतले पाहिजे असे सांगत लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “१९८० पर्यंत प्रशासकीय सेवेत एक प्रकारचा ध्येयवाद होता मात्र नंतर तो घसरत गेला. प्रशासकीय अधिकारी हे सरकारचे नोकर नाही तर धोरणांची अंमलबजावणी करणारे आहेत ही प्रतिमा याच काळात पुसली गेली. आज ‘लाभार्थी ब्युरोक्रसी’ पहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांची कामे करणे, लोककल्याण याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कल हवा. विवेक लख्ख जागा ठेवत, बंधुता, समता यांचे पालन करत अधिकाऱ्यांनी काम करायला हवे. हे करीत असताना नम्रता, स्पष्टता आणि ध्येय यांबरोबरच चौकटी बाहेर विचार करण्याची क्षमता त्यांमध्ये असायला हवी.”

भारत सासणे म्हणाले, “आज समाजात प्रशासकीय अधिकारी म्हणजे एक वेगळा समज सर्वसामान्यांमध्ये आहे तो मोडायचा असेल आणि आतील गोष्टी सामान्य नागरिक व वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर हे पुस्तक नक्की वाचायला हवे. शिस्त आणि विवेकी मन यांची सांगड घालत प्रत्येक अधिकाऱ्याने काम करायला हवे.”

म्हैसेकर यांच्या कुटुंबातील पुरोगामित्व हे फक्त विचारप्रधान नाही तर आचारप्रधान होतं याचा प्रत्यय त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीकडे पाहिल्यावर आपल्याला येतो असे सांगत प्रा मिलिंद जोशी म्हणाले, “या पुस्तकात एक ओलावा आहे, जिव्हाळा आहे. सरकारी अधिकारी देखील समाजासाठी जीव तोडून काम करू शकतात हे जाणून घेण्यासाठी सामान्य नागरिकांनी हे पुस्तक जरूर वाचावे. आपल्याला राजकारण्यांकडून अपेक्षा ठेवता येत नाहीत कारण जेव्हा सत्ता मिळाले तेव्हा ते नागरिकांचे नाही तर स्वतः चे हितसंबंध जपण्यासाठी काम करतात मात्र जर संवेदनशील, समाजाभिमुख, रचनात्मक काम करायचे असले तर सनदी अधिकारीच हे करू शकतात असे मला वाटते. मात्र हे करीत असताना आपण सत्तेपासून किती अंतरावर राहायचे याची आडाखे त्यांना ठरवावे लागतील, असे मत प्रा मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

आजच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी साहित्य, राजकारण व प्रशासन अशा तीनही क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित आहेत. हे सर्वच जण पुस्तकप्रेमी आहेत. शासकीय अधिकाऱ्यांबद्दल ज्या शंका कुशंका असतात त्या चुकीच्या ठरतील असे हे पुस्तक आहे. आज पुस्तक प्रकाशकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वाचन संस्कृती रुजावी व कायम राहावी यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी मदत करणे गरजेचे आहे  त्यासाठी प्रामुख्याने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यालयीन संकुलांमध्ये पुस्तकांची दालने उघडावीत असे आवाहन करत अरविंद पाटकर म्हणाले, “आज महाराष्ट्रात ललित साहित्याची पुस्तके असणारी केवळ ४२ दालने आहेत. राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये तर अशा प्रकारच्या पुस्तकांची दालनेच नाहीत, ही चिंतेची बाब आहे आणि त्यामुळेच वाचन संस्कृती टिकावी यासाठी मोठ्या पदावरील सरकारी अधिकाऱ्यांचे सहकार्य गरजेचे आहे.”

डॉ दिलीप म्हैसेकर व अथर्व म्हैसेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांनी केले तर डॉ दिपक म्हैसेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुप्रिया चित्राव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले डॉ दिलीप म्हैसेकर यांनी आभार मानले.