पुणे, २८ ऑक्टोबर २०२४ : कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या आमोल बालवडकरांनी अखेर विधानसभेच्या रणांगणातून माघार घेतली आहे. बालवडकरांच्या माघारीमुळे चंद्रकांतदादा पाटलांचे टेन्शन पूर्णपणे मिटलं असून, दादांना मोठ्या मताधिक्याने संकल्प बालवडकरांनी केला आहे. चंद्रकांतदादा पाटलांनी आज (दि.२८) बालवडकर यांची भेट घेतली. त्यावेळी आपण दादांना विजयी करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे बालवडकर यांनी स्पष्ट केले.
अमोल बालवडकर हे कोथरूड मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपच्या पहिल्या यादीत कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर बालवडकर अपक्ष लढणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. एवढेच नव्हे तर, बालवडकरांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत चंद्रकांतदादांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे कोथरूडमध्ये बंडखोरी होणार असल्याची चर्चा होती.
बालवडकरांच्या या भूमिकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील नाराज असलेल्या बालवडकरांची भेट घेत त्यांच मनवळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला यश आले नव्हते. या भेटीबाबत बालवडकर यांना विचारले असता बालवडकर म्हणाले, ‘बावनकुळे साहेब माझ्या घरी आले होते हे खरं आहे. त्यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, मी त्यांना उमेदवारी मागितली त्यांनी याबाबत विचार करू, असं मला आश्वासन दिलं. मी अजूनही आशावादी आहे. मला विधानसभा निवडणूक लढवायची आहे’, अशी प्रतिक्रिया बालवडकर यांनी लेट्सअप मराठीला दिली होती. त्यामुळे मतदानापूर्वी चंद्रकांतदादांची धाकधूक वाढली होती. परंतु आता बालवडकरांनी दादांना मोठ्या मताधिक्यांने विजयी करण्याची जबाबदारी आपली असल्याचे म्हणत त्यांच्या विजयाचा विडा उचलला आहे. त्यामुळे भाजपसह चंद्रकांतदादांचं मोठं टेन्शन मिटलं आहे.
धाडीनंतर दिला पाठिंबा
एकीकडे बालवडकरांनी चंद्रकांतदादांविरोधात मैदानात उतरणार अशा चर्चा असतानाच दुसरीकडे बालवडकर यांचे सख्के मेव्हणे महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी असलेले अभिजीत कटके यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली होती. या कारवाईनंतर चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरोधात बालवडकर यांनी शड्डू ठोकल्यानेच विधानसभेच्या तोंडावर हा राजकीय ड्रामा करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. तर, महाराष्ट्राच आणि देशाचं नाव ज्याने उंचावले कटके यांच्या घरी छापा पडणं हे आमच्यासाठी चिंतेची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया बालवडकर यांनी दिली होती. मात्र, आता बालवडकर यांनी कोथरूडमधून माघार घेत चंद्रकांतदादांना विजयी करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता सर्वात सेफ मतदारसंघ असलेल्या कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांच पाटलांच्या पुन्हा विजयाचा आशा पल्लवित झाल्या आहेत.
बालवडकर म्हणाले प्रथम राष्ट्र….
या तत्त्वावर भारतीय जनता पक्ष निष्ठेने जनतेची सेवा करत आला आहे. मी या पक्षाचा एक भाग असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणे हा उद्देश नेहमीच राहिला आहे आणि तो एक लोकप्रतिनिधी या नात्याने पूर्ण देखील केला आहे.
परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवणार अशी इच्छा व्यक्त केली होती. सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला उमेदवारी मिळावी यासाठी मी आग्रही होतो. परंतु भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना संधी मिळाली, काही गोष्टींवरून आमचे मतभेद होते, मात्र आज ते मतभेद माझे नेते आणि राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दूर झाले आहेत. त्यामुळे आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी मी मागे घेत असून मा. चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा देत आहे.
आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा कोथरूड मध्ये भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि चंद्रकांतदादांच्या प्रचारार्थ मेहनत घेईल. विशेष म्हणजे या विधानसभेच्या सर्व प्रक्रियेत माझ्या सोबत असणारी जनता आणि कार्यकर्ते यांना विचारूनच मी हा निर्णय घेतला आहे. शेवटी जनतेच्या शब्दाबाहेर मी कधीच जाणार नाही आणि येणाऱ्या काळात जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटत राहील , असे बालवडकर यांनी नमूद केले आहे.
More Stories
पुणेकरांचा बंडखोरांना ठेंगा, ५७ वर्षात एकाचाही विजय नाही
आपल्यातील राजकीय शत्रुत्वाचा सूड महिलांवर काढू नका – देवेंद्र फडणवीसांचा मविआच्या नेत्यांवर टीका
शरद पवारांच्या व्यंगावर बोलल्याने अजित पवार भडकले, सदाभाऊ खोतांना दिला इशारा