April 21, 2025

इंदापूर विधानसभेसाठी तीव्र तिरंगी लढत: नवख्या प्रवीण मानेंचे अनुभवी दिग्गजांना कडवे आव्हान

इंदापूर, २७/१०/२०२४: इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रमुख तीन उमेदवारांमध्ये – अपक्ष प्रवीण माने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांच्यात तीव्र संघर्ष अपेक्षित आहे. अनुभवी पाटील आणि भरणे यांच्या समोर नवखे असलेले प्रवीण माने तगडे आव्हान निर्माण करत आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या दिवशी माने यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करून “फॉर्म काढणार नाही” अशी भीमगर्जना केली, तर त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करून आपल्या समर्थकांना कामाला लागण्याचे निर्देश दिले. दत्तात्रय भरणे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शनासह अर्ज भरला.

प्रवीण माने यांनी निवडणुकीदरम्यान इंदापूरच्या विकासकामांवर लक्ष केंद्रित करून टीका-टिप्पणी टाळण्याची हमी दिली, तर त्यांचे वडील दशरथ माने यांनी याआधीच्या निवडणुकींचे दाखले देत विजयाचा दावा केला. त्यामुळे या निवडणुकीत इंदापूरवासीयांना नवख्या माने आणि अनुभवी पाटील व भरणे यांच्या चुरशीच्या लढतीची अनुभूती मिळण्याची अपेक्षा आहे.