July 8, 2025

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वंकष वाहतूक आराखडा –महाराष्ट्र राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, ३ जुलै २०२५: पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सन २०२४ मध्ये पुणे शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यानुसार विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

विधानसभा सदस्य सुनिल कांबळे, भिमराव तापकीर, राहुल कूल, बापूसाहेब पठारे आणि विजय शिवतारे यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती.

राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, पुण्यातील वाहनसंख्येत प्रचंड वाढ झाली असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अहवालानुसार शहरात सुमारे ४० लाख ४२ हजार ६५९ वाहने सध्या रस्त्यावर आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी पुणे महापालिका आणि वाहतूक पोलीस विभाग समन्वयाने काम करत आहेत.

कॅन्टोन्मेंट भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नो पार्किंग व नो होल्टिंग झोन तयार करणे, सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण, तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिग्नल्स आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येत आहे.

राजधानीचे वाढते शहरीकरण लक्षात घेऊन २०५४ पर्यंतच्या संभाव्य वाढीचा विचार करून रिंगरोड, बायपास रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यांसारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्था उभारण्याचा आराखड्यात समावेश आहे. याशिवाय वाहतूक बेटांची निर्मिती, पथ दुभाजक, ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती, दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंग आदी उपायांची अंमलबजावणीही सुरू आहे.

महानगरपालिकेच्या मुख्य व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत वाहतूक सुधारणा विषयक नियमित बैठकांचे आयोजन करून अंमलबजावणी अधिक परिणामकारक केली जात आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील समन्वय वाढवण्यासाठी वाहतूक आराखड्यांतर्गत सूचना व हरकती मागविल्या जाणार असून, स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जातील, असेही मंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केले.