October 3, 2024

क्रेडाई-महाराष्ट्रतर्फे बांधकाम मजुरांसाठी कृतज्ञता सप्ताह, १ मे ते ८ मे दरम्यान राज्यभर आयोजन

पुणे ता. २७/०४/२०२३: बांधकाम मजुरांप्रती असणारा आदर कृतीतून व्यक्त करण्याच्या विधायक भावनेतून क्रेडाई महाराष्ट्रतर्फे ‘कृतज्ञता सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १ मे ते ८ मे दरम्यान हा सप्ताह राज्यातील संपूर्ण शहरात साजरा केला जाणार असून यासाठी विविध सामाजिक उपक्रमांची आखणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे. अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

 खैरनार पाटील म्हणाले की,  बांधकाम मजूर म्हणजे बांधकाम क्षेत्राचा पाया. एकूणच बांधकाम क्षेत्राच्या विकासात्मक वाटचालीत बांधकाम मजुरांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करणे ही जबाबदारी नसून आमचे कर्तव्य आहे. म्हणूनच येत्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून क्रेडाई महाराष्ट्रतर्फे राज्यातील एकूण ६६ शहरांमध्ये हा उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे. सचिव विद्यानंद बेडेकर, कामगार कल्याण आणि कौशल्यविकास विभागाचे निमंत्रक सुनील पाटील, क्रिडा आणि सीएसआर विभागाचे निमंत्रक गोपेश यादव, प्रितेश गुजराथी, दीपा पतारे, अमिना मुल्ला, नरेंद्र कुलकर्णी आणि सह संयोजक संदीप मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहर संघटनांना पुरस्कार तसेच ‘बांधकाम कामगारांसाठी सर्वोत्कृष्ट काळजी घेणारे विकसक’ यासाठी एक विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, या सप्ताहासाठी एकूण ८ उपक्रमांची आखणी संस्थेतर्फे करण्यात आली असून त्यापैकी कोणतेही ३ उपक्रम राबवून क्रेडाई शहर संघटना या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. यासाठी योजलेले उपक्रम पुढीलप्रमाणे,

१.नोंदणी अभियान -कामगार कल्याण कार्यालयात मजुरांची नोंदणी करून घेणे. ज्यामुळे मजुरांना भविष्यात विमा, माध्यान्ह भोजन, टूल किट, आर्थिक सहाय्य, मुलांचे शिक्षण, गृहनिर्माण कर्ज/अनुदान आदी योजनांचा लाभ घेता येईल.

२.आरोग्य तपासणी शिबीर- कामगारांसाठी मोफत मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, रक्त तपासण्या. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी मोफत आरोग्य, नेत्र आणि दंत तपासणी आदी आरोग्य तपासणी शिबीर घेणे.

३. ज्ञान सत्र: या माध्यमातून सर्व कामगारांना वैयक्तिक स्वच्छता आणि काळजी याविषयी माहिती देणे.

४. सुरक्षिततेचे उपाय -बांधकाम प्रकल्पावर वापरल्या जाणार्‍या सुरक्षा उपायांचे (पीपीई) महत्त्व सांगणे.

५. कौशल्य विकास- मजुरांसाठी क्रेडाई कुशलच्या सहकार्यातून  “कौशल्य विकास कार्यक्रम’ घेणे.

६. रक्तदान शिबीर- कामगारांसाठी प्रकल्पाच्या ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे.

७. कामगार कल्याण योजना -प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना, जीवन ज्योती विमा योजना इत्यादी कामगार कल्याणकारी योजनांची माहिती कामगारांना देण्यासाठी विशेष मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करणे.

८.शिष्यवृत्ती – होतकरू मजुरांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती घोषित करणे. आदी उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक विकसक व शहर संघटना या सप्ताहात सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडतील, असा विश्वास खैरनार पाटील यांनी व्यक्त केला आहे.