April 28, 2024

जर्मनीमध्ये स्थलांतर करणाऱ्यांना आता ग्योथं इन्स्टिट्यूटकडून मोफत मार्गदर्शन

पुणे, दि ३० ऑगस्ट, २०२३ : जर्मनीमध्ये स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या महत्वाकांक्षी नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जर्मनीची ग्योथं-इन्स्टिट्यूट / मॅक्स म्यूलर भवन, जर्मनीमध्ये जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणार आहे. यशस्वी  करिअर घडवू इच्छिणाऱ्यांना जर्मनीचे मोठे आकर्षण आहे, हे जाणून, भारत आणि जर्मनी यांच्यातील सांस्कृतिक नाते आणखी दृढ करण्यासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या ग्योथं इन्स्टिट्यूटने जर्मनीत जाऊ पाहणाऱ्या बुद्धीमान, महत्वाकांक्षी तरुणाईसाठी एक विशेष मार्गदर्शन सेवा सुरू केली आहे केली आहे. ग्योथं इन्स्टिट्यूटने अशा प्रकारची सेवा प्रथमच सुरू केली आहे.

या सेवेचा एक भाग म्हणून ग्योथं-इन्स्टिट्यूट / मॅक्स म्यूलर भवनतर्फे युरोपियन युनियनच्या सहकार्याने जर्मनीत जाऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी मोफत मार्गदर्शन देऊ केले आहे. या मार्गदर्शन सेवेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी फक्त पुण्यातील द ग्योथं-इन्स्टिट्यूट / मॅक्स म्यूलर भवन, येथे नोंदणी करायची आहे. जर्मनीमधील दैनंदिन कार्यपद्धती आणि त्यासाठीची पूर्वतयारी, व्हिसा प्रक्रिया, रोजगाराच्या संधी, सांस्कृतिक वातावरण आदी विविध प्रकारच्या सेवासुविधांचे मार्गदर्शन आणि समुपदेशन, भाषाविषयक प्रमाणपत्रासाठी सहाय्य, तसेच जर्मनीत प्रत्यक्ष स्थलांतरित होण्याआधीच्या स्थित्यंतराच्या काळात आवश्यक तो पाठिंबा, इन्स्टिट्यूट देऊ करेल. जर्मनीमध्ये स्थायिक होण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, हा उद्देश यामागे आहे.

वैयक्तिक भेटीगाठी, दूरध्वनी, ऑनलाईन व्यासपीठे, ई मेल्स तसेच वैविध्यपूर्ण परिसंवाद, माहिती देणाऱ्या कार्यशाळा, शिबिरे, तसेच विभिन्न सांस्कृतिक नाती जोडणारे अनेक उपक्रम, याद्वारे जर्मनीमधील भावी वास्तव्य सुखकर होण्यासाठी मार्गदर्शन, सल्लासेवा उपलब्ध केली जाईल. काही आवश्यक आशयघन बाबींसाठी ऑनलाईन व्हिडिओ सेशन्स तसेच गरजेनुसार मुद्रित स्वरूपातही सहाय्य केले जाईल.