May 12, 2024

वर्षातील सर्वोत्तम बुद्धिबळ प्रशिक्षकांमध्ये पुण्याचे पाहिले ग्रँड मास्टर अभिजित कुंटे

पुणे, 29 जानेवारी 2024: भारताचे चौथे व पुण्याचे पाहिले ग्रँड मास्टर श्री अभिजित कुंटे यांनी प्रशिक्षक म्हणून केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्दल जागतिक बुद्धिबळ महासंघाने ( फिडे ) त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ क्षेत्रात अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या ‘वख्तांग कार्सेलाडझे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 
 
अर्थात ‘फिडे’च्या वतीने देण्यात येणारा वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षकांचा पुरस्कार भारताच्या अभिजित कुंटे आणि आरबी रमेश यांना जाहीर झाला आहे. त्यांना 2023 सालासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.प्रशिक्षक म्हणून खुल्या विभागातील सर्वोत्तम कामगिरीमुळे रमेश हे मिखाईल बोट्विनिक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आर. प्रज्ञानंद, 2022च्या दुबई खुल्या स्पर्धेचा विजेता अरविंद चिदम्बरम, आर. वैशाली आणि सविता श्री आदी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. अभिजित कुंटे यांना महिला संघाना प्रशिक्षण देताना केलेल्या यशस्वी कामगिरीसाठी वखतांग कार्सेलाड्झे पुरस्कार जाहीर झाला आहे. 
 
ग्रँडमास्टर श्री अभिजित कुंटे यांनी नॉन प्लेइंग कॅप्टन व प्रशिक्षक म्हणून काम करताना भारतीय महिला संघाला जागतिक महिला सांघिक विजेतेपद (2021), आशियाई स्पर्धेत (2022) रौप्य पदक व 44व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत कांस्य पदक मिळवून दिले. 
 
प्रशिक्षक म्हणून महिला किंवा कुमारीच्या स्पर्धेतील सर्वोतम कामगिरीकरिता  वख्तांग कार्सेलाडझे  पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी फिडे’चा आभारी आहे. खुल्या विभागासाठीचा पुरस्कार जिंकल्याबद्दल आरबी रमेशचेही अभिनंदन करतो. भारतीय खेळाडूंशिवाय हे यश आम्हाला शक्य झाले नसते, असे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी सांगितले.