July 27, 2024

ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद ठरले ३२व्या पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते

पुणे, दि. १२ मार्च २०२३ : इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीचा (आयओसीएल) युवा बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने ७.५ गुण मिळवत, ३२ व्या पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

आयओसीएल’च्या वतीने पीवायसी हिंदू जिमखाना येथे आयोजित ३२ व्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धा (वैयक्तिक ) रविवारी संपन्न झाली.  स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात आयओसीएल कंपनीच्या एचआर विभागाचे कार्यकारी संचालक आणि प्रमुख डॉ. एम आर दास, कंपनीच्या नवनिर्मिती आणि कामगार सुविधा विभागाचे महाव्यवस्थापक अनिल मिश्रा, पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष अश्विन त्रिमल, पुणे विभागीय कार्यालयाच्या संस्थात्मक व्यवसाय विभागाच्या महाव्यवस्थापक कविता टिकू आणि स्पर्धेचे मुख्य परीक्षक नितीन शेणवी या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.  स्पर्धेत एकूण ७४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकावरील तीनही खेळाडू हे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीचे खेळाडू होते.  यामध्ये आर प्रज्ञानंद याने ७.५ गुणांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयन आणि ग्रँडमास्टर अधिबान बी यांनी बरोबरीच्या सामन्यात प्रत्येकी ७ गुण मिळवित  अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.

स्पर्धेत ८ व्या फेरीनंतर इंडीयन ऑईल कॉर्परेशन’च्या ग्रँडमास्टर अधिबान बी सोबत संयुक्त आघाडीवर असलेल्या आर प्रज्ञानंद यांनी ९ व्या फेरीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता यांच्यावर मात करून स्पर्धेच्या विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयन यांनी अंतिम फेरीत ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या ग्रँडमास्टर मित्रभा गुहा यांच्याविरुद्धची लढत कल्पक डावपेचांच्या आधारे जिंकली. बरोबरीच्या सामन्यात ७ गुण मिळवून त्यांनी उपविजेतेपद पटकावले.

स्पर्धेत मुरली कार्तिकेयन, अधिबान बी व दीप सेनगुप्ता यांनी प्रत्येकी ७ गुण मिळविले. प्रगत व माध्यम गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक मिळाला. अधिबान बी यांना रौनक साधवानी विरुद्धचा डाव बरोबरी सोडवावा लागला.  युवा खेळाडू रौनक साधवानी याला ६.५ गुणांनी पाचवे स्थान मिळाले.

याप्रसंगी रौनक साधवानी यांना स्पर्धेतील ‘सर्वात आश्वासक खेळाडू’ या विशेष पुरस्काराने तर, मुरली कार्तिकेयन यांना स्पर्धेत ‘ उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडू’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर अव्यावसायिक खेळाडू श्रेणीत एनआरएल’चे केसवरापू उमा साई महेश यांना प्रथम पारितोषिक तर आयओसी – एओडी’चे एस महातो यांना द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर सांघिक स्पर्धेत विजयी ठरलेल्या आयओसी – ए या संघालादेखील पारितोषिक प्रदान करण्यात आले.

स्पर्धेतील प्रथम १० स्थानावरील खेळाडू व त्यांचे गुण
१) ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद (७.५ गुण)
२) ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयन (७ गुण)
३) ग्रँडमास्टर बी अधिबान (७ गुण)
४) ग्रँडमास्टर दीप सेनगुप्ता (७ गुण)
५) ग्रँडमास्टर रौनक साधवानी (६.५ गुण)
६) ग्रँडमास्टर वैभव सुरी (६.५ गुण)
७) ग्रँडमास्टर एम आर वेंकटेश (६.५ गुण)
८) ग्रँडमास्टर मित्रभा गुहा (६ गुण)
९) ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता (६ गुण)
१०) आंतरराष्ट्रीय मास्टर पद्मिनी राऊत (६ गुण)