May 2, 2024

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला उजाळा

पुणे, ०२/०४/२०२४: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात रसिक प्रेक्षकांना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे. या चित्रपटाचे अभिनेते रणदीप हुडा यांनी २०२२ मध्ये रंगारी भवनाला भेट देऊन सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात आणि त्यामागील इतिहास याची माहिती घेतली होती, तसेच हा सर्व इतिहास त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून मांडला जाईल असा शब्द प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांना दिला होता. या प्रसंगाने त्या शब्दाची पूर्तता झाल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची ख्याती आहे. स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी सामाजिक एकतेची जी पार्श्वभूमी आवश्यक असते त्यावरुन गणेशोत्सव हा केवळ एक सांस्कृतिक किंवा धार्मिक उत्सव नाही तर स्वातंत्र्य चळवळीचाच एक भाग असल्याचे मानता येणार आहे. याच अनुषंगाने स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणपती बाप्पाचं दर्शन होत आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या मूर्तीप्रमाणे दिसणारी हुबेहूब दुसरी मूर्ती बनवून ती या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या उत्सवात क्रांतिकारक हत्यारे, पुस्तकं, पत्र आदी गोष्टींची देवाण-घेवाण करताना स्पष्ट दिसत आहेत. यावरुन स्वातंत्र्यपूर्व काळात उत्सवाच्या माध्यमातूनही स्वातंत्र्य चवळवळ कशी चालवली जात होती, याचं दर्शन रसिक प्रेक्षकांना होते. हा प्रसंग पाहताना रसिकांच्या अंगावर देशभक्तीच्या भावनेतून शहारे आल्याशिवाय रहात नाहीत.

२०२२ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे काम सुरू असताना गणेशोत्सवा दरम्यान अभिनेते रणदिप हुडा यांनी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’ येथे भेट देऊन भवनाचा क्रांतिकारी इतिहास जाणून घेतला होता. त्यावेळी ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी स्वतः मोबाईलमध्ये भवनाचा इतिहास छायाचित्राच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून कैद केला होता. त्यामध्ये भुयारी मार्ग, गुप्त बैठका ज्या ठिकाणी होत असत त्या जागेचे फोटो घेतले होते आणि या बाप्पाच्या उत्सवाचा प्रसंग चित्रपटात दाखवणार असल्याचा शब्दही त्यांनी पुनीत बालन यांना दिला होता. अखेर एका जाज्वल्य देशभक्तावर आधारीत असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात त्यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याचे दिसत आहे.

“श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चं इतिहास एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पण याच ट्रस्टला आपल्या चित्रपटात स्थान देऊन ते महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचा शब्द अभिनेते रणदिप हुडा यांनी दिला होता. आज त्यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता झाल्याने बाप्पाच्या भाविकांप्रमाणेच ट्रस्टचा उत्सवप्रमुख म्हणून माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. याबाबत मी अभिनेते रणदिप हुडा यांचे मनस्वी आभार मानतो.’’ – पुनीत बालन, विश्वस्त व उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

“इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. या बाप्पाची मूर्ती ही राक्षसाचा संहार करताना दिसत असल्याने ती एक प्रेरणादायक आहे. इथं राक्षस म्हणजे ब्रिटिश असंच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांना त्यावेळी सांगायचं होतं. गणेशोत्सवातील या मूर्तीमुळे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची ताकद मिळाली. हा सर्व इतिहास जाणून घेतल्यानंतर ही मूर्ती चित्रपटात वापरण्याचा निर्णय घेतला.” – रणदीप हुडा