May 16, 2024

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ होणार ‘ऑक्सफर्ड ऑफ द सेंटर आशिया’

पुणे, २९/०४/२०२४: ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लवकरच आपल्या ज्ञानशाखा विस्तारत ‘ऑक्सफर्ड ऑफ द सेंटर आशिया’ बनण्याचा मार्गावर आहे. याचाच एक भाग म्हणून आज (२९ एप्रिल २०२४) मध्य आशियातील तीन आंतराराष्ट्रीय विद्यापीठाने पुणे विद्यापीठाच्या आशय पत्रावर ( Letter Of Intent (LOI)) स्वाक्षरी केली.

विद्यापीठाच्या शिवाजी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, कॅस्पियन युनिव्हर्सिटी, कझाकस्तानचे रेक्टर नुसेनोव्ह झोल्डास्बेक, इस्ट युरोपियन युनिव्हर्सिटी, जॉर्जियाचे रेक्टर डॉ. काखाबेर लाझाराहविली आणि किर्गिझ प्रजासत्ताक, किरगिझस्तानच्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे रेक्टर प्रा. अल्दारारालिव्ह असिलबेक, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकार, प्रभारी कुलसचिव आणि आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक प्रा. (डॉ) विजय खरे, यांच्यासह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील, बागेश्री मंथाळकर, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. नितीन घोरपडे, प्रा. संदीप पालवे, डॉ. धोंडीराम पवार, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. डॉ. संगीता जगताप, सागर वैद्य उपस्थित होते.

कझाकस्तानमधील कॅस्पियन युनिव्हर्सिटी, जॉर्जियामधील इस्ट युरोपियन युनिव्हर्सिटी आणि किरगिझस्तानमधील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या शिष्टमंडळाने आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्यांनी आशय पत्रावर ( Letter Of Intent (LOI)) स्वाक्षरी करत शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबींची देवाणघेवाण करण्यासंबंधी चर्चा केली. याप्रसंगी बोलताना, विद्यापीठ आपले पाय आंतरराष्ट्रीय स्तरावर रोवत असून ही आशय पत्रावरील स्वाक्षरी म्हणजेच आपल्या ‘ऑक्सफर्ड ऑफ द सेंटर आशिया’ होण्याच्या मार्गावरील पहिले पाऊल आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी म्हणाले. तसेच वैद्यकीय शास्त्र, व्यवस्थापन शास्त्र आणि शिक्षणशास्त्र या विषयावर विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सलग्नता करार करून नविन सामायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासंबंधी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आज झालेल्या हेतू पत्रावरील स्वाक्षरीमुळे सहभागी विद्यापीठ एकमेकांची कार्यप्रणाली जाणून घेऊन त्यांच्या विस्तारीकरणावर भर देणार आहेत. यांतर्गत विद्यार्थी, शिक्षक आणि इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण करण्यासंबंधी फ्रेमवर्क तयार करण्यात येणार आहे. तसेच उपलब्ध सुविधा आणि संसाधनांचे आदानप्रदान करण्यावरही भर देण्यात येणार आहे. याशिवाय यांतर्गत विविध चर्चासत्र, परिषद आणि कार्यशाळांचेही आयोजन करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेता यावे यासाठी नविन संयुक्त अभ्यासक्रमही बनविण्यात येणार आहे.