April 27, 2024

सायंकालीन वातावरणात उजळले ‘मालवरंग’

पुणे, दि. ४ सप्टेंबर २०२३ : माळवा प्रांताचे, तेथील सांस्कृतिक जीवनाचे, तिथल्या समरसून जीवन जगणाऱ्या आनंदी जनसमूहाचे मनमुक्त प्रतिबिंब ‘मालवरंग’ या सादरीकरणातून रसिकांनी अनुभविले. रसिकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहात विदुषी कलापिनी कोमकली आणि पं. भुवनेश कोमकली यांनी ‘मालवरंग’च्या माध्यमातून विदुषी डॉ वीणा सहस्रबुद्धे यांच्या स्मृतींना आगळेवेगळे सांगीतिक अभिवादन केले.

निमित्त होते, विदुषी डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित ‘सूर महती’ महोत्सवाचे. ‘सूर महती फाऊंडेशन’ च्या वतीने नुकतेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सदर महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

‘मालवरंग’ मधून रागसंगीतापासून लोकसंगीतापर्यंत वैविध्यपूर्ण रचनांची सुरेल मालिका कलापिनी कोमकली, भुवनेश कोमकली यांनी पेश केली. श्री, कामोद, मारवा, धनबसंती, सावनी, केदार अशा रागांमधील रचनांसह मुक्त स्वरांची उधळण करणारी माळवी लोकगीते आणि निर्गुणी भजनेही त्यांनी सादर केली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला), राजगोपाल गोसावी (ढोलक) तसेच नीरजा आपटे (निवेदन) यांनी रंगतदार साथसंगत केली. याप्रसंगी ज्येष्ठ तबलावादक आणि वीणाताईंना अनेक वर्षे तबल्याची साथ करणारे पं. विनायक फाटक तसेच ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दिलीप देवधर यांचा कलापिनी कोमकली यांच्या हस्ते कृतज्ञता पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दंडी संन्यासी नरसिंह आश्रम स्वामी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन झाले. दिप्ती भोगले, पं. संजीव अभ्यंकर, कलापिनी कोमकली, डॉ. सुनील काळे, डॉ. हरी सहस्रबुद्धे, मानसी खांडेकर, रवींद्र खांडेकर, अतुल खांडेकर, भक्ती खांडेकर, सावनी शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर डॉ. वीणा सहस्रबुद्धे तसेच त्यांचे ज्येष्ठ बंधू पं. काशिनाथ बोडस यांनी रचलेल्या बंदिशी व भजने यांचा ‘नाद-निनाद’ हा कार्यक्रम संपन्न झाला. डॉ वीणा सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य अतुल खांडेकर यांनी राग मुलतानी आणि रागेश्री सादर करत गुरू वीणाताईंना स्वरांजली अर्पण केली. सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांनी राग मेघ तसेच बागेश्रीच्या माध्यमातून गुरूस्मरण केले. या दोन्ही शिष्यांनी आपल्या गुरुंच्या रचनांचे अर्घ्यही अर्पण करून आदरांजली वाहिली.

उत्तरार्धात विदुषी किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या रागेश्रीमधील गायनाने रसिकांची दाद मिळवली. विदुषी मोगुबाई कुर्डीकर यांची बंदिशी, गुरू नानकजी यांचे भजन आणि लोकआग्रहास्तव ‘अवघा रंग एक झाला…’ या भक्तिरचनेने पं. रघुनंदन यांनी सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) यांनी साथ केली. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्या संपूर्ण सांगीतिक कारकीर्दीचा मागोवा घेणारा ‘वीणेचा चिरंजीव झंकार’ हा चरित्रपट पाहण्याची संधी या महोत्सवात रसिकांना मिळाली. सदर चरित्रपटाची संकल्पना व दिग्दर्शन अतुल खांडेकर व भक्ती खांडेकर यांचे असून अंजली मालकर यांनी चित्रपट संहिताचे लेखन केले आहे. चरित्रपटातून उलगडलेला वीणाताईंचा जीवनपट पाहताना रसिकांचे डोळे पाणावले.