December 13, 2024

रसिकांनी सायंकाळी अनुभवले रात्रसमयीचे ‘कानडा के प्रकार’

पुणे दि. २० एप्रिल, २०२३ : भारतीय अभिजात संगीतातील रात्र समयीच्या रागांचे सौंदर्य आणि त्यातील भाव श्रीमंत आशय, सुरेल गायनातून रसिकांसमोर शुक्रवारी उलगडला. आकृतिबंधांचे वैविध्य हे या मैफलीचे वैशिष्ट्य होते. दरबारी, नायकी, काफी, कौशी, अभोगी, शहाणा, रायसा, अडाणा…असे ‘कानडा’ रागाचे अनेकविध सांगीतिक आविष्कार रसिकांनी ‘कानडा के प्रकार’ या मैफलीच्या रूपाने अनुभवले.

प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनच्या वतीने नवी पेठेतील एस एम जोशी सभागृह येथे या आगळ्यावेगळ्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना आणि सादरीकरण प्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर यांचे होते. सानिया यांच्यासह त्यांच्या विविध शहरांतील विद्यार्थ्यांनी या मैफलीत सुरेल स्वरसहभाग घेतला. ज्येष्ठ व्हायोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये, प्रसिद्ध गायक राजेंद्र कंदलगावकर, डॉ. शुभांगी बहुलीकर तसेच रवींद्र दुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘कानडा के प्रकार’ या मैफलीच्या संकल्पनेविषयी सानिया पाटणकर म्हणाल्या,‘रात्रीच्या मैफलींवर बंधने आल्यामुळे अलीकडच्या काळात रात्रीचे राग ऐकण्यापासून रसिक वंचित आहेत. एक कलाकार म्हणून रात्रीच्या प्रहरी गायिल्या जाणाऱ्या रागांची तालीम गुरू डॉ. अश्विनी भिडे देशपांडे, डॉ. अरविंद थत्ते आणि डॉ. मिलिंद मालशे यांच्याकडून मिळाली असूनही, हे राग सादर करण्याची संधी मिळत नाही. या रागांच्या श्रवणाचा सुंदर अनुभव रसिकांना काही प्रमाणात देता यावा, या हेतूने एक प्रयोग म्हणून रात्री गायिले जाणारे ‘कानडा के प्रकार’ चढत्या सायंकाळी रसिकांसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे,’.

नायकी कानडामधील ‘मेरो पिया’ या बंदिशीच्या सादरीकरणापासून सुरू झालेल्या या मैफलीत पारंपरिक तसेच अनेक रचना, तराणा, त्रिवट, थाटमाला, सरगम गीत, चित्रपटगीत..असे रचनाप्रकारांचे वैविध्य होते. सानिया पाटणकर यांनी या अभिनव संकल्पनाधारित मैफलीसाठी केलेला अभ्यास, चिंतन, संशोधन, विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली तयारी तसेच प्रस्तुतीमधील प्रयोगशीलता लक्षणीय होती. सुरेल गायनाच्या जोडीने कानडा रागातील विविध प्रकार सादर करताना, त्यातील सूक्ष्म बारकावे, लयीची आंदोलने, तालांचे वैविध्य आणि कानडामधील काही अनवट प्रकार दर्शवताना केलेली ‘मिडले’ची योजना, हे रसिकांची दाद मिळवणारे ठरले.

या मैफलीत प्रशांत पांडव आणि कार्तिकस्वामी यांनी  तबल्याची तर अभिनव रवंदे यांनी हार्मोनिअमची रंगत वाढवणारी  साथसंगत केली. स्वाती प्रभूमिराशी यांनी सूत्रसंचालन केले.