July 24, 2024

पुणे: कान्हे रेल्वे स्थानक परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून खून

लोणावळा, २०/०५/२०२३: वडगाव मावळ परिसरातील कान्हे रेल्वे स्थानक परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. खूनामागचे कारण समजू शकले नसून वडगाव मावळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

भागुजी बाबुराव काटकर (वय ५४, रा. पारगाव, ता. वडगाव मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत काटकर यांचा मुलगा ओंकार (वय १९) याने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भागुजी काटकर कान्हे फाटा परिसरातील महिंद्रा कंपनीत कामाला होते. काल रात्री ते कामाला गेले हाेते. कान्हे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुळाच्या परिसरात काटकर यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याचे उघडकीस आले. काटकर यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आहेत.

या घटनेची माहिती मिळताच लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक विलास भोसले तपास करत आहेत.