April 28, 2024

‘स्वरविलास’ या सांगीतिक कार्यक्रमात पुणेकरांनी अनुभवली मेवाती घराण्याची बहारदार गायकी

पुणे दि. ४ सप्टेंबर, २०२३ : राग भीमपलासी, राग पूरिया कल्याण आणि राग रागेश्री यांच्या साक्षीने पुणेकरांनी एक दाटून आलेली सायंकाळ अनुभवीत मेवाती घराण्याच्या बहारदार गायकीचा आस्वाद घेतला. निमित्त होते उद्योजक विलास जावडेकर यांनी आयोजिलेल्या ‘स्वरविलास’ या सांगीतिक कार्यक्रमाचे.

कोथरूड मधील, मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला. विलास जावडेकर, कल्पना जावडेकर, सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, आकाशवाणीचे तांत्रिक संचालक गजानन सुरवसे, ओर्लीकॉन बाल्झरचे प्रवीण शिरसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रतिभावान तरुण कलाकार आणि पं संजीव अभ्यंकर यांचे शिष्योत्तम असलेल्या साईप्रसाद पांचाळ यांच्या दमदार गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनी राग भीमपलासीचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी ‘कगवा बोले मोरी अटरिया शगुन देत…’ हा बडा ख्याल तर ‘जा जा रे अपने मंदिरवा’ ही द्रुत ख्याल मधील बंदिश प्रस्तुत केली. यानंतर त्यांनी ‘लगन बिन जागे ना निरमोही…’ ही संत कबीरांनी लिहिलेली आणि गुरु पं संजीव अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेली रचना सादर केली. साईप्रसाद यांना अजिंक्य जोशी (तबला), अभिनय रवंदे (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

‘स्वरविलास’ कार्यक्रमाचा समारोप पं संजीव अभ्यंकर यांच्या सुमधुर आणि कसलेल्या गायनाने झाला. त्यांनी राग पुरिया कल्याण प्रस्तुत करीत रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. राग पुरीया कल्याण हा माझा आणि माझ्या बायकोचा आवडता राग आहे असे सांगत पं अभ्यंकर यांनी ‘आज सुबना लाड लडावन…’ ही विलंबित एकतालातील रचना प्रस्तुत केली. यानंतर त्यांनी ‘दिन रैन कछु न सुहावे…’ ही छोटा ख्यालमधील बंदिश सादर केली. सादरीकरणाच्या उत्तरार्धात त्यांनी राग रागेश्री प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी ‘मायरी मेरो श्याम लग्यो संग डोले…’ ही रचना आणि ‘साजना रे जिया लागत ना…’ ही आपले शिष्य सचिन नेवपूरकर यांची बंदिश गायली. संत सूरदास यांची रचना असलेल्या ‘अखियां हरिदरसन की प्यासी…’ या सिंध भैरवीने त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

त्यांना अजिंक्य जोशी (तबला), अभिनय रवंदे (संवादिनी), धनंजय म्हसकर आणि विलिना पात्रा (स्वरसाथ) आणि निधी हेगडे (तानपुरा) साथ केली. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.