पुणे, दि. ३० जून, २०२३ : बाहेर सुरू असलेली पावसाची संततधार, दाटून आलेले वातावरण आणि ‘मल्हार धून’ कार्यक्रमात सभागृहात सादर झालेल्या मल्हार रागाच्या विविध छ्टांनी आज पुणेकर रसिक चिंब भिजले… निमित्त होते ओर्लीकॉन बाल्झर्स आणि व्हायोलिन अकादमी यांच्या वतीने आयोजित आठव्या ‘स्वरमल्हार’ महोत्सवाचे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आजपासून तीन दिवसीय स्वरमल्हार महोत्सवाला सुरुवात झाली. यावर्षी बढेकर गृप, विलास जावडेकर डेव्हलपर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लि., विलो यांचे विशेष सहकार्य महोत्सवाला लाभले आहे.
व्हायोलिन अकादमीचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, ओर्लीकॉन बाल्झर्सचे प्रवीण शिरसे, बढेकर गृपचे प्रवीण बढेकर, जावडेकर डेव्हलपर्स विलास जावडेकर, लोकमान्य मल्टीपर्पजचे भालचंद्र कुंटे,व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये यांच्या उपस्थितीत आज महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले.
आपल्या बुजुर्ग आणि प्रतिभावान कलाकारांनी आजवर दोन रागांची सांगड घालत जयंत मल्हार, चांदणी मल्हार, मिरा मल्हार, रामदासी मल्हार असे मल्हार तयार केले आहेत. हे मोठाले मल्हार असून एकाच कार्यक्रमात ते शक्यतो एकत्र गायले जात नाहीत. पण एकाच कलाकाराने अशा पद्धतीने एकाच कार्यक्रमात त्याचे सादरीकरण करावे आणि या मल्हारांना न्याय मिळावा याबरोबरच एकाच कथेत गुंफत ते रसिकांसमोर सादर व्हावेत या उद्देशाने ‘मल्हार धून’ कार्यक्रम आम्ही घेऊन आलो आहोत अशी माहिती विदुषी देवकी पंडित यांनी दिली.
यावेळी वैभव जोशी आणि देवकी पंडित यांनी ही कथा सांगताना मल्हार रागाच्या अनेक छटा अलगद उलगडून दाखविल्या. यावेळी त्यांनी ‘तेव्हा खरा पाऊस येतो…’, ‘अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी… ‘, ‘आली री सगन घन लागे…’, तेव्हा तुझं आभाळ पाहून गाण्यात रमलो नसतो तर…’ , ‘गडद निळे, गडद निळे जलद भरूनी आले…’, ‘रुप की घटा हो राधे..’, ‘उमड घन गगन आयो रे…’, ‘पाऊस कोसळे हा अंधार हा दिसे…’, ‘पपीहा पिहू पिहू बोले…’ या कविता व रचनांचे सादरीकरण केले. अश्विन श्रीनिवासन यांच्या बासरीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना प्रशांत पांडव (तबला), अभिनय रवांदे (संवादिनी), ओंकार दळवी (पखवाज), सुस्मिरता डवालकर व मिरा निलाखे (तानपुरा व गायन) यांनी साथसंगत केली तर डॉ समीरा गुजर- जोशी यांनी या कार्यक्रमाचे लेखन व निवेदन केले.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.