November 7, 2024

पुणे : कोथरूडमध्ये शिवसेनेकडून निष्ठावंत चंद्रकांत मोकाटे यांना संधी

पुणे, २७ ऑक्टोबर २०२४: कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी पक्षातील निष्ठावंत असलेले माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. कोथरूडमध्ये आता चंद्रकांत पाटील चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे अशी तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.

कोथरूड मधून भाजपने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेकडून चंद्रकांत मोकाटे यांच्यासह माजी पक्षनेते पृथ्वीराज सुतार हे इच्छुक होते. भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने अमोल बालवडकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती. त्यासाठी ते शिवसेनेच्या नेत्यांना भेटण्यासाठी मुंबईला देखील गेले होते. त्यामुळे बालवडकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना अचानकपणे ठाकरे यांनी चंद्रकांत मोकाटे यांच्या नावाची घोषणा केली आहे. आज त्यांनी मातोश्री येथे जाऊन एबी फॉर्म स्वीकारला आहे.

चंद्रकांत मोकाटे हे कोथरूड गावठाण भागातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले असून त्यांनी पुणे महापालिकेचे उपमहापौर पद देखील भूषविलेले आहे. २००९ ते २०१४ च्या काळात त्यांनी कोथरूड विधानसभेचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. २०१४ ला त्यांनी भाजपच्या मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला. तर २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतलेला नव्हता, आता २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.