July 27, 2024

जीवनशैली हीच मधुमेहावरील उपचार पद्धती ठरेल; डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे प्रतिपादन

पुणे, दि. ३ जुलै, २०२३ : औषधांविना मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो, फक्त आहार – विहाराची शिस्त आणि शिस्तपालनातील सातत्य, सांभाळले पाहिजे – म्हणजे दीक्षित जीवनशैली हीच मधुमेहावरील उपचार पद्धती ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी रविवारी केले. असोसिएशन फॉर डायबेटिस अॅंड ओबेसिटी रिव्हर्सल’ (एडीओआरई) आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन डायबिटीस केअर प्रोग्राम’ यांच्या तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.

याप्रसंगी ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत नवरंगे, प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नरेंद्र जावडेकर तसेच इन्फोसिस, पुणेचे उपाध्यक्ष प्रवीण कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी पुणे केंद्रातील मधुमेह मुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करणाऱ्या सदस्यांचा कौतुक सोहळा आणि सत्कार करण्यात आले. यशस्वी सदस्यांनी आपल्या यशोगाथाही यावेळी कथन केल्या. सर्व यशस्वी सदस्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करून त्यांना भेट म्हणून मोफत HbA1c तपासणीचे तीन कूपन देण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ. दीक्षित म्हणाले, “पुणे केंद्रातील अनेक सदस्यांनी आपले HbA1c औषधे न घेता किंवा ती बंद केल्यावर ६.५ च्या खाली नेले आहे. ही अवस्था किमान ६ महिने राहणे याला तांत्रिक भाषेत डायबिटीस रेमीशन असे म्हणतात. पुणे केंद्रात तीन वर्षात किमान १००० रुग्ण मधुमेह मुक्त व्हावे हे आमचे ध्येय आहे.  हा कुठला क्रॅश कोर्स नाही तर जीवनशैली आहे. ताज्या अहवालानुसार, आपल्या देशात ११.३ टक्के लोक मधुमेही आहेत. तर तब्बल २८ टक्के नागरिकांना लठ्ठपणाची समस्या आहे. इतक्या मोठ्या संख्येने विकारग्रस्तता असल्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत संशोधन न करता, त्यावरील नवी औषधे निर्माण करण्याकडे धोरणात्मक कल दिसतो. त्याऐवजी जीवनशैलीत बदल घडवून आणले पाहिजेत, हे समजून घेणे आवश्यक आहे.”

मधुमेहासारख्या रोगाला औषधांनी प्रतिकार करण्यापेक्षा जीवनशैली द्वारे त्यावर मात करणे, हा उत्तम प्रतिसाद आहे. हेच आमच्या अभियानाचे उद्दिष्ट आहे. मधुमेहाला प्रतिक्रियात्मक उत्तर देण्यापेक्षा जीवनशैलीचा प्रतिसाद द्यावा,’ असे आवाहन दीक्षित यांनी केले. मधुमेहाचे निदान झालेल्या लोकांनी औषधे सुरू करण्यापूर्वी आमच्या पुण्यातील जंगली महाराज रोडवरील मोफत मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्राला नक्की भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

प्रवीण कुलकर्णी यांनी दीक्षित यांच्या अभियानाला पाठिंबा देण्यामागील इन्फोसिसची भूमिका स्पष्ट केली. नजिकच्या काळात अजून १५ केंद्रे सुरू करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

डॉ. नवरंगे यांनी मधुमेही व्यक्तींनी ५ डी चा अवलंब करावा.‌ डिसाईड, डेलिबरेशन, डेडिकेशन, डिव्होशन आणि डिसीप्लिन, हे पाच डी वापरा आणि मधुमेह मुक्त राहा, असा सल्ला त्यांनी दिला.

डॉ. जावडेकर म्हणाले, “जगाला भेडसावणाऱ्या मधुमेहावर डॉ. दीक्षित यांनी शोधलेल्या जीवनशैलीचा अवलंब, हा उत्तम उपाय आहे. विशिष्ट पॅथीचा दुराग्रह न बाळगता जीवनशैली बदलणे आवश्यक आहे.”

शिल्पा उनकुले यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास जोशी यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला तर अविनाश गोखले यांनी आभार मानले.