पुणे, दि. २३/०६/२०२३: कारागृहातील कैद्यांना नातलगांसोबत संवाद साधण्यासाठी कॉईनबॉक्सऐवजी स्मार्टकार्ड फोनद्वारे संवाद साधता येणार आहे. प्रायोगिक तत्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. योजनेची अमलबजावणी चांगल्यारितीने झाल्यास संपुर्ण राज्यात स्मार्टकार्ड फोन उपक्रमाची अमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी प्रायोगिक तत्वावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधित सुविधेचे उद्घाटन गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कैद्यांना नातेवाइकांशी संपर्क करण्यासाठी कॉइन बॉक्स सुविधा आहे. परंतु, कॉईन बॉक्स सद्यस्थितीत बाजारात उपलब्ध होत नाहीत. कॉईन बॉक्स नादुरूस्त झाल्यास दुरूस्ती करून मिळत नाही. त्यामुळे बहुतांशी सुविधा बंद झाल्यामुळे कैद्यांचा नालगांसोबत संवादाला आडकाठी निर्माण झाली होती. त्याशिवाय अति सुरक्षा विभाग, सुरक्षा यार्ड व विभक्त कोठड्यांमधील बंद्यांनाही नातेवाइकांशी संपर्क करण्यासाठी कॉईन बॉक्स असलेल्या ठिकाणी न्यावे लागत होते. त्यामुळे कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक ठरण्याची शक्यता होती. त्यापार्श्वभूमीवर काही कारागृह अधिक्षकांनी कॉईन बॉक्सऐवजी साधे मोबाइल फोन वापर करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्वावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा सुरू करण्याची शिफारस शासनाकडे केली होती.
महिन्यातुन ३ वेळा प्रत्येकी १० मिनिटांसाठी संवाद
प्रस्तावाला शासनाने मान्यता दिल्यानंतर अॅलन ग्रुप, एल- ६९ तमिळनाडू यांच्यावतीने शुक्रवारपासून (दि. २३ ) कारागृहातील बंद्यांना पात्रतेनुसार महिन्यातुन ३ वेळा प्रत्येकी १० मिनिटांसाठी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे बंद्यांना स्वतःच्या कुटुंबाशी संपर्क साधणे सोईस्कर झाले आहे. नातेवाईकांशी आणि वकिलांशी सुसंवाद झाल्याने कारागृहातील बंद्यांचा मानसिक ताण-तणाव कमी होऊन कारागृह सुरक्षेचा प्रश्न कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, येरवडा कारागृहात सुरु केलेल्या स्मार्ट कार्ड फोन सुविधेचा आढावा घेऊन राज्यातील कारागृहामध्येही उपक्रमाची अमलबजावणी केली जाणार आहे. त्याशिवाय भविष्यामध्ये स्मार्ट कार्ड फोन सुविधेत आणखी सुधारणा करून पात्रतेसंदर्भात शिथीलता आणण्याचा विचार करण्यात येणार आहे.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.