पुणे, २३/०६/२०२३: सन २०१९ मध्ये १७ पक्षांची मिसळ पार्टी झाली होती. आता अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे हे दोन चेहरे वाढले आहेत. असे कितीही चेहरे उभे राहिले, तरी २०१९ मध्ये मोदींच्या मागे देश उभा राहिला. यापुढेही भारताची जनता मोदींच्या मागे उभी राहील. हे सगळे आता आपल्या अस्तित्वाची शेवटची लढाई लढत आहेत, असे मत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
कसबा मतदारसंघांमध्ये कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या पुढाकाराने आयोजित ‘घर चलो अभियानाचा’ शुभारंभ तुळशीबागेमधून झाला. यावेळी हेमंत रासने यांसह कसबा मतदारसंघातील माजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांच्या भविष्याची चिंता आहे. सोनिया गांधींना राहुल गांधींची चिंता आहे. शरद पवार साहेबांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे. सन २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतर आपले अस्तित्व राहणार नाही. आपण जे काय काळे व्यवहार केले आहेत ते जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाहीत, ही त्यांच्यामध्ये भीती आहे.
ते पुढे म्हणाले, नरेंद्र मोदींनी ९ वर्षात केलेले जे काम आहे. ते काम घर ‘चलो अभियानाच्या माध्यमातून घरा-घरापर्यंत पोहोचवले जात आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात ६० हजार घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. मोदीजींच्या ९ वर्षाच्या कार्यकाळाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून केलेले काम, याची शिदोरी आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही बिनधास्तपणे जनतेत जातो. आनंदाने मोदींचे हे पत्र जनता स्वीकारत आहे. पुन्हा एकदा २०२४ मध्ये मोदी पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
More Stories
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला: महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
सिंबायोसिस तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन