September 17, 2024

गंभीर वैद्यकीय आजार असलेल्या व्यक्तींसाठी ‘आत्मन’ या उपक्रमाद्वारे विवाह जुळवणी व समुपदेशन

पुणे दि. १३ जुलै, २०२३ : गंभीर वैद्यकीय आजार असलेले तरुण तरुणी आवश्यक वैद्यकीय उपचार घेऊन पुढील आयुष्याचा विचार करत असताना त्यांच्यासाठी योग्य जोडीदार शोधणे आणि त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात सकारात्मकरीत्या व्हावी यासाठी त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करणे या उद्देशाने पुण्यातील सुप्रिया आणि राहुल शिंदे या दाम्पत्याने ‘आत्मन’ हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.

या विवाह जुळवणी व समुपदेशन उपक्रमाद्वारे ओळख झालेल्या रेहा आणि इंद्रनील (नाव बदलले आहे) या दाम्पत्याच्या लग्नाला आता पाच महिने होत असून अशा पद्धतीचा स्वीकाराह्य दृष्टीकोन आजार असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये वाढीस लागावा यासाठी ‘आत्मन’ कार्यरत आहे, अशी माहिती ‘आत्मन’च्या संस्थापिका सुप्रिया शिंदे यांनी आज प्रभात रस्त्यावरील सीसी अँड कंपनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यांचे पती राहुल शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते.

२००७ साली माझे राहुल शिंदे यांच्याशी घरच्यांच्या पसंतीने ठरवून लग्न झाले. मात्र, लग्नाच्या १५ दिवसांमध्येच माझ्या पतीला रक्ताचा कॅन्सर असल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये समोर आले असे सांगत सुप्रिया शिंदे म्हणाल्या, “माझ्या पतीवर एकीकडे वैद्यकीय उपचार सुरु असताना या आजाराबद्दल डॉक्टर हे रुग्णाला माहिती देतात मात्र, त्याची काळजी घेणाऱ्या त्याच्या कुटुंबियांसोबत तितक्या सहजतेने माहितीची देवाण घेवाण होत नाही हे मला प्रकर्षाने जाणवले. त्या वेळी रूग्णांसोबतच कुटुंबियांचे समुपदेश महत्त्वाचे आहे हे लक्षात आल्यानंतर काहीतरी करायला हवे हा विचार मनात सुरु झाला. यातूनच पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात मी रक्ताच्या कर्करोगाचे रुग्ण व त्यांचे कुटुंबिय यांचे समुपदेशन सुरु केले.”

त्या पुढे म्हणाल्या, “गंभीर वैद्यकीय आजार झालेल्या व्यक्ती या आपल्याला आजार झाला आहे हे समजल्यापासून आपल्याच कोषात जातात. नंतर अगदी उपचार सुरु झाले तरीही त्यातून बरे झाल्यानंतर देखील त्यांचे समाजात मिसळणे आपोआप कमी होत जाते. त्यामुळे आजार बरा झाला असला अथवा नियंत्रणात असला तरीही आयुष्यभर सोबत देणारा जोडीदार आपल्याला मिळेल का? आपण पुन्हा सकारात्मकरीत्या समाजातील इतरांप्रमाणे आयुष्य जगू शकू का? हे प्रश्न त्यांच्या समोर असतात. यासंदर्भात विचार करताना गंभीर आजारातून बरे झालेल्या व्यक्तींसाठी आम्ही ‘आत्मन’ मॅट्रिमोनिअल उपक्रम सुरु केला.” विशेष म्हणजे असा विचार करीत आजवर कोणीही विवाह संस्था स्थापन केली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गंभीर आजार असलेल्या तरुण तरुणींचे विवाह जुळविण्यासाठी कोणतेच संकेतस्थळ अथवा विवाह संस्था नाहीत हे लक्षात येत असताना सध्या कार्यरत असलेल्या संकेतस्थळावर देखील अशा गंभीर आजार झालेल्या किंवा आजार नियंत्रणात असलेल्या विवाहेच्छुक तरुण तरुणींची माहिती उपलब्ध नाही हे देखील समोर आले. त्यातूनच ‘आत्मन’ या विवाह संकेतस्थळाची संकल्पना सुचली. मात्र इतर संकेतस्थळांपेक्षा यामध्ये समुपदेशनाचा महत्त्वपूर्ण भाग असेल, असेही आमच्या लक्षात आल्याचे शिंदे यांनी आवर्जून नमूद केले.

यामध्ये आजारातून बरे झालेले किंवा ज्यांचा आजार आता नियंत्रणात आहे अशा विवाह करण्यास इच्छुक असलेल्या तरुण तरुणींकडून आम्ही त्यांची संपूर्ण माहिती घेतो. त्यांच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतो. दोघांची माहिती एकमेकांना दाखवून त्यांची पसंती असल्यास भेट घालून देतो. पसंतीनंतर लग्न करण्याचा निर्णय जर त्या दोघांनी घेतला तर त्यांच्या कुटुंबियांना भेटवतो. केवळ आवडी निवडी आणि अपेक्षा इथवर न थांबता आम्ही त्याही पुढे जात या दोघांच्याही कुटुंबीयांना त्यांच्या त्यांच्या डॉक्टरांनाही भेटवतो. या टप्प्यावर मनातील सर्व शंका दूर झाल्या की पुढचा लग्नाचा निर्णय त्या तरुण तरुणी आणि कुटुंबियांचा असतो. आवश्यकतेप्रमाणे आणि त्यांची इच्छा असेल तर पुढेही आम्ही समुपदेशन करतो, असेही सुप्रिया यांनी सांगितले.

हे सर्व करीत असताना रूग्णांसोबतच कुटुंबियांमध्ये आणि पर्यायाने समाजामध्ये गंभीर आजारांबाबत असलेली जागरूकता वाढविणे, अशा तरुण तरुणींना आयुष्याचा जोडीदार निवडण्यास मदत करणे हा ‘आत्मन’चा उद्देश असून यामध्ये रक्ताशी संबंधीत कॅन्सर, दिव्यांग, एचआयव्ही ग्रस्त रुग्ण आणि थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांसाठी विवाह जुळवणी व समुपदेशन आम्ही करतो, अशी माहितीही सुप्रिया शिंदे यांनी दिली.

या उपक्रमाद्वारे पाच महिन्यांपूर्वी एक विवाह संपन्न झाला असून ते दाम्पत्य आपल्या वैवाहिक जीवनाचे पाच महिने ११ जुलै रोजी साजरे करीत असल्याचा आम्हाला आनंद आहे, असेही सुप्रिया यांनी सांगितले.