October 3, 2024

पुणे: प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्तीवर बंदीच

पुणे, १३ जुलै २०२३ : प्लास्टर ऑफ पॅरीस पासून बनविलेल्या गणेश मूर्तीवर बंदी असल्याने पीओपीच्या गणेश मूर्ती खरेदी करू नये . मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल रंग, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मूर्ती बनविणारे कारागीर आणि उत्पादक यांच्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. त्यानुसार पारंपारिक शाडू माती वापरून बनवलेल्या कच्चा मालापासून मूर्ती तयार करणे. मुर्तीसाठी प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी), प्लास्टिक आणि थरमाकोल (पॉलीस्टीरिन) यांचा वापर करू नये. मूर्तींचे दागिने बनविण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादींचा वापर करावा आणि मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने रेझीन्सचा चमकदार सामग्री म्हणून वापर केला जाऊ शकतो. मूर्ती रंगविण्यासाठी रासायनिक रंग , ऑईल पेंट्स, इनॅमल आणि कृत्रिम रंगावर आधारित पेंटसच्या वापर करण्यास सक्त मनाई आहे. नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावे. रंगविण्यासाठी फक्त नैसर्गिकरीत्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या रंगाचा वापर करावा. मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणारे गणेश मूर्तिकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिक यांचेकडून मूर्ती खरेदी करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे असे आवाहन पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.