April 28, 2024

मुस्लीम नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात

पुणे, १३ सप्टेंबर २०२३ ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने संघटनात्मक मुस्लीम नेत्यांनाही संधी देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मुस्लीम मतदारांनीही भाजपला मतदान करावे यासाठी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुस्लीम नेते प्रचारासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘‘मोदी सरकारच्या योजना मुस्लिम समाजापर्यंत पोचविण्यासाठी हा प्रयत्न आहे’’, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे यांनी पुण्यात भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बावनकुळे म्हणाले, ‘‘मुस्लिम समाजात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आत्मीयता आहे. या समाजाने भारत यशस्वी होत असल्याचे पाहिले आहे यामुळे ते नरेंद्र मोदी यांनाच मतदान करतील. सरकारच्या योजना मुस्लीम समाजापर्यंत पोचाव्यात, त्याचा लाभ घ्यावा यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय मुस्लीम नेत्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
महायुतीचे सरकार खेळीमेळीत व समन्वय साधून लोकहिताचे निर्णय घेत आहेत. भारत आत्मनिर्भर व्हावा यासाठी मोदी यांचे प्रयत्न सुरू असून, त्याला साथ देण्यासाठी इतर पक्ष सोबत आले आहेत. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे यावर सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यासह पूर्ण सरकारच तेथे गेले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात चांगले काम केले आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर कुणीही उमेदवार असला तरी त्या दोन लाखाहून अधिक मतांनी निवडून येतील. उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी स्टॅलिनचे वक्तव्य त्यांना मान्य आहे का? हे महाराष्ट्राला सांगावे. या वक्तव्यानंतरही ते इंडिया आघाडीतच राहणार असतील तर त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

नार्वेकर मेरीटवरच निकाल देतील
विधानसभा अध्यक्षांसमोर उद्यापासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून ५०० पानी उत्तर तयार केले असून, त्यावर बाजू मांडण्यासाठी दोन वकील नियुक्त केले आहेत. त्यावर बावनकुळे म्हणाले, ‘‘ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उत्कृष्ट वकील आहेत. ते मेरीटवरच निकाल देतील. कोणावरही अन्याय होणार नाही असा निकाल ते देतील.