July 27, 2024

विरोधक बेमोसमी येतात आणि निघून जातात – देवेंद्र फडणवीस यांची टीका

पुणे, ११ मे २०२४ : महाराष्ट्राचा मौसम बदलला आहे. समोरील विरोधक लोकं ही बेमौसमी आहेत. बेमौसमी लोकं कधीही येतात आणि जातात, ते जनतेच्या लक्षात राहत नाहीत, अशी टीका विरोधंकांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच शरद पवार यांच्या बारामतीच्या निवडणुकीनंतर आलेल्या वाक्यावरून लक्षात येते की मौसम बदलला असल्याची टिप्पणी देखील फडणवीस यांनी केली.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार सांगता सभेत शनिवारी फडणवीस बोलत होते. मंत्री चंद्रकांत पाटील, निरीक्षक खासदार रणजितसिंह निंबाळकर, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, सभेला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती आहे, महिलांचा आशीर्वाद असल्याने आपला विजय निश्चित झाला आहे. आपल्याला दिल्लीचा नेता निवडायचा आहे. कोण देश चालवू शकतो, कोण देशाला सुरक्षित ठेवू शकतो याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. दुसरीकडे राहुल गांधी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षांची खिचडी आहे, त्यांच्याकडं नेता नाही. या पक्षांना नेता नाही, नियत नाही. आपली युती विकासाच्या गाडी सारखी आहे. आपल्या विकासाच्या गाडीत सर्वांसाठी जागा आहे. ही गाडी सगळ्यांना बसवून विकासाकडे घेऊन जाते. राहुल गांधींकडे सर्व इंजिनच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात परिवर्तन होईल असे काम केले आहे. गेल्या दहा वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. 64 कोटी लोकांना 10 लाखाचे विना तारण मुद्रा लोण दिले. आता 20 लाखापर्यंत कर्ज देणार आहेत. 80 लाख बचत गट तयार केले आणि त्यातून 10 कोटी महिलांना काम दिले. त्यापैकी 3 कोटी महिलांना लखपती करण्याचे ठरवले आहे. ज्यांचा कोणी विचार केला नाही त्यांचा विचार मोदींनी केला. देशात लाखो उद्योजक तयार करण्याचे काम मोदींनी केले. गरिबी हटाव नारा देयाचे पण गरिबी हटवली नाही. यांनी स्वतःची गरिबी हटवली. मोदी यांनी भ्रष्टाचार संपवला. अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. अर्थव्यवस्था मोठी होते तेव्हा रोजगार निर्माण होतात, मजबूत देश तयार करता येतो.

विरोधकांचे नाव घेऊन टीका करणार नाही…
सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला भाजपने संधी दिली. तळागळातील समस्या मला माहिती आहेत, गरिबीतील प्रश्नांची मला जाणीव आहे. कोविड काळात कुटूंब प्रमुख म्हणून महापौर पदावर असताना काम केलं, त्याचं तुम्ही सर्वांनी कौतुक केलं. मी ठरवलं होतं की कोणत्या उमेदवारावर वैयक्तिक टीका करणार नाही, नेत्यांवर टीका करणार नाही. पण विरोधक खालच्या पातळीवर टीका करत आहेत, तरीही मी कुणाचं नाव घेणार नाही असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.