May 20, 2024

आपल्या देशाची ‘भारत’ ही ओळख प्राचीन – संजीव सन्याल

पुणे, 12 मे 2024: आपल्या देशाची ‘भारत’ ही ओळख अत्यंत प्राचीन असून ती काळानुसार अधिक दृढ होत गेली असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, लेखक व पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य संजीव सन्याल यांनी केले.

‘पुणे संवाद’ उपक्रमांतर्गत आयोजित ‘भारतवर्ष – द ओरीजिन्स ऑफ अवर सिव्हिलायझेशनल आयडेंटीटी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान कर्नाटक शाळेच्या शंकुतला शेट्टी सभागृहात संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती अभय फिरोदिया व पुणे संवाद उपक्रमाचे संयोजक मनोज पोचट उपस्थित होते.

सर्वप्रथम भारत – तृत्सू नावाचा एक वेदिक समुदाय हा पवित्र सरस्वती नदीच्या काठावर असल्याच उल्लेख ऋग्वेदात मिळतो. या समुदायाचा प्रमुख सुदास व वसिष्ठ ऋषींनी इतर दहा समुदायांना हरविले आणि सुदास भारतचा पहिला चक्रवर्ती राजा झाल्याचा उल्लेख मिळतो. त्यांनर त्यांनी सगळ्या समुदायांचे व त्यांच्या तत्वज्ञानाचे एकत्रीकरण करून वेदांच्या संहितेमध्ये रुपांतर केले. अशा रीतीने पहिल्या सभ्यतेचा पाया आपल्या देशात रचला गेला. त्यामध्ये विरोधापेक्षा एकत्रीकरण करण्यावर भर होता. पुराणांमध्ये, प्रामुख्याने ब्रह्म पुराणामध्ये व महाकाव्यांमध्ये समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला असलेला देश हा भारत असून तेथील लोकांना भारती असे संबोधलेले दिसते. तसेच यावरून भारतच्या भौगोलिक व सांस्कृतिक इतिहाचा मेळ घालता येतो व भारत ही आपली ओळख किती प्राचीन आहे हे समजायला मदत होते, असे सन्याल म्हणाले.

भारतातील शक्तीपीठे, पर्वतरांगा, नद्या, परदेशी प्रवाशांनी केलेली वर्णनं, शंकराचार्यांनी केलेला प्रवास व त्यांनी स्थापन केलेली भौगोलिक दृष्ट्या महत्वाची पीठे या सर्वांचा अभ्यास केला असता आपल्या असे निदर्शनास येते की भारताची एक सुसंस्कृत राष्ट्र म्हणून असलेली ओळख खूप प्राचीन आहे. नवनवीन कल्पनांचा अंगीकार करत गेली हजारो वर्ष ही ओळख विकसित होत गेली. त्यावर व्यापार, विचारांचे आदान प्रदान, स्थलांतर, परकीय आक्रमणे आदी बाबींचा मोठा परिणाम देखील झाला, असेही ते म्हणाले.

ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाल्यावर भारतीय गणराज्याचा पाया रचताना हे प्राचीन संस्कृतीचे आधुनिक प्रकटीकरण आहे या गोष्टीचा मान सर्व संस्थापकांकडून राखला गेल्याचे आपल्याला दिसून येते, ही बाब सन्याल यांनी आपल्या भाषणादरम्यान अधोरेखित केली. सन्याल यांनी भारतातील समृद्ध अशा वैदिक संस्कृतीचे अनेक दाखले दिले. भारत हा सप्तनद्यांचा देश असून त्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. फक्त पंजाबमध्ये नाही तर भारताच्या इतर प्रांतांमध्येही सात नद्या होत्या असे त्यांनी सप्रमाण सिद्ध करण्याच्या प्रयत्न आपल्या भाषणादरम्यान केला. सन्याल यांनी आपल्या व्याख्यानादरम्यान दिलेल्या विविध संदर्भांशी संबंधित ऋचांचे पठण संस्कृत भाषेच्या काही विद्यार्थिनींनी सदर केले.

नव्या पिढीला भारताच्या समृद्ध अशा प्राचीन संस्कृतीविषयी गोडी निर्माण करण्यासाठी सुरुवातीला लोकप्रिय साधनांचा वापर करावा, असा सल्ला देखील संजीव सन्याल यांनी यावेळी उपस्थितांना दिला. ते म्हणाले की त्यांना स्वतःला या विषयात अमर चित्रकथा वाचून गोडी निर्माण झाली. तुलसीदासांचे रामायण देखील अशा साहित्याचे एक उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कन्नड संघ, पुणेच्या सचिव मालती कलमाडी यांच्या हस्ते संजीव सन्याल व अभय फिरोदिया यांच्या सत्कार करण्यात आला.