February 12, 2025

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

पुणे, ४ फेब्रुवारी २०२५ : नागरिकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिवस आयोजित करण्यात यावा, असे परिपत्रक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहे.

नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरिता मुख्यमंत्री यांनी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. त्याअंतर्गत राज्याच्या प्रशासनात 100 दिवसात प्राधान्याने करावयाच्या बाबींबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिकांचे प्रश्न विहित मुदतीत व कायदेशीर पद्धतीने सुटले नाहीत तर नागरिक जिल्हास्तरीय कार्यालयाकडे दाद मागतात. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नागरीक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तसेच इतर जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाटे मारतात व तक्रारींचे प्रमाण त्यामुळे वाढीस लागते ही बाब प्रकर्षाने निदर्शनास आलेली आहे.

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिकांचे प्रश्न विहित मुदतीत सुटले तर नागरीकांचे जिल्हास्तरावर येण्याचे प्रमाण घटून त्यांच्या दैनंदिन अडचणी कमी होण्यास मदत होते. यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होते.
या कारणास्तव प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिवस आयोजित करण्यात यावा. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल, असेही या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.