February 12, 2025

पुणे महापालिका देणार तीन दिवसात नळजोड

पुणे, ४ फेब्रुुवारी २०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांचे उद्दिष्ट दिले आहे. यात प्रामुख्याने प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, आता महापालिकेकडून अर्ज केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात नवीन नळजोड दिला जाणार आहे. या संदर्भात नवीन बांधकामे तसेच मिळकतींना हे नळजोड देण्याबाबत पाणी पुरवठा विभागाकडून कार्यालयीन आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत. पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना हे आदेश देण्यात आले असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नवीन नळजोड देताना पाणीपुरवठा विभागाकडून जवळपास डझनभर कागदपत्रांची मागणी केली जात होती. त्यात अर्ज, मालकी हक्काची कागदपत्रे, बांधकामाचा मान्य नकाशा, कॉलनी वॉटर लाइन, डेव्हलपमेंट प्रमाणपत्र, भोगवटा पत्र, पूर्वीचा नळजोड असल्यास बिल, मालकाचे नाव पत्ता कागदपत्रे, परवानाधारक प्लंबरचा वैध दाखला, नळजोड घेणार त्याचा नकाशा, हमीपत्र अशा कागदपत्रांचा त्यात समावेश होता. त्यामुळे, नागरिक अनधिकृत नळजोड घेण्यास प्राधान्य देतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने मागील वर्षी कागदपत्रांची संख्या कमी करून करून केवळ मालकी हक्क आणि मिळकतकराची नोंदणी असली, तरी नळजोड देण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतर आता ३ दिवसातच नवीन नळजोडास मान्यता दिली जाणार आहे.
——————————–
याच नळजोडांना मिळणार मान्यता
पाणी पुरवठा विभागाच्या आदेशानुसार, ज्या अर्जासोबतची कागदपत्रे पूर्ण असतील, तसेच अर्ज पूर्ण भरलेला असेल, त्यांनाच या कालावधीत मान्यता दिली जाईल. अपूर्ण कागदपत्रे अथवा अर्ज असल्यास, तसेच कागदपत्रांबाबत काही शंका असल्यास या मुदतीत मान्यता दिली जाणार नाही. तसेच ही प्रशासकीय मान्यता असून प्रत्यक्ष नळजोड देण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. तसेच, या नव्याने दिलेल्या नळजोडांची स्वतंत्र नोंदही ठेवली जाणार आहे.