May 12, 2024

वाहतूक समस्या व पादचारी सुरक्षेसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविणार – विकास ढाकणे

पुणे, दि. २१ फेब्रुवारी २०२३: ” पादचारी सुरक्षा हा सध्याच्या स्थितीत कळीचा मुद्दा बनला आहे. शहरातील लोकसंख्या आणि वाहनांचे वाढते प्रमाण, खराब रस्ते आणि वाहतूक कोंडी अशा विविध कारणांमुळे पादचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली असून, त्यांच्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक असून, वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पुढील वर्षभरात सर्वांच्या सहकार्याने नियोजन बद्ध कार्यक्रम राबविणार,” अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (विशेष) विकास ढाकणे यांनी दिली.

क्रेडाई पुणे मेट्रो आणि सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुणे महानगरपालिका व पुणे वाहतूक पोलीस ह्यांच्या सहकार्याने ‘पाऊल पुढे? – हात समोर !’ या विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. साधू वासवानी रस्ता येथील क्रेडाई पुणे मेट्रो’च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (विशेष) विकास ढाकणे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी क्रेडाई पुणे मेट्रो’ चे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे, महासंचालक डॉ. डी के अभ्यंकर, सर व्यवस्थापक उर्मिला झुल्का, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य संजय देशपांडे, संघटनेच्या कामगार कल्याण समितीचे अधिकारी समीर पारखी, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट’चे संचालक हर्षद अभ्यंकर, वाहतूक विभागाच्या रस्ते सुरक्षा विभागाचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत रघतवान हे उपस्थित होते. शहरातील पादचारी सुरक्षा हा विषय केंद्रस्थानी ठेवून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

महापालिका आणि वाहतूक विभाग यांनी शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असणारे ४५ ब्लॅक स्पॉट शोधले आहे. त्याठिकाणी वाहतूकीसंदर्भात विविध उपाययोजना राबविण्याबाबत काम सुरू आहे. त्याचप्रमाणे रस्ते सुरक्षा या अनुषंगाने महापालिका शहरातील १५ रस्त्यांचा पुर्नविकास करणार आहे, अशी माहिती देखील ढाकणे यांनी यावेळी दिली.

यावेळी मोहिमेबाबत माहिती देताना हर्षद अभ्यंकर म्हणाले, ” वाहतूक ही पुण्यातील एक गंभीर समस्या बनली आहे. केवळ वाहतूक कोंडीच नव्हे, तर पादचारी सुरक्षितता हादेखील महत्वाचा मुद्दा बनला आहे. अभ्यासानुसार, पुण्यातील पादचारी मृत्यूचे प्रमाण. गेल्या तीन वर्षात तब्बल ६७ टक्क्यांनी वाढली आहे. ही समस्या सोडविण्याची जबाबदारी केवळ एका व्यक्ती किंवा घटकाची नसून, ती सार्वजनिक जबाबदरी आहे. त्यामुळेच विविध संघटना,नागरिक आणि प्रशासन यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही या मोहिमेची सुरवात केली आहे. याअंतर्गत विविध शाळांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ आणि संवादाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करणार आहोत. यासाठी झेबी – द झेब्रा या मॅस्कोट’चा देखील वापर आम्ही करणार आहोत.

रणजित नाईकनवरे म्हणाले, ” सध्या चौकाचौकात मेट्रोची कामे चालू आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली असून, वाहन चालकांची देखील तारांबळ होत असते. त्यामुळे एकदा का हिरवा दिवा लागला, की वाहन चालक एकदम सुसाट वेगाने वाहन चालक वाहने चालवू लागतात. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढते. अशा स्थितीत पादचारी सुरक्षितता राखण्यासाठी अनेक उपक्रम करायची गरज आहे. त्यादृष्टीने ही मोहीम म्हणजे पहिले पाऊल आहे. अधिकाधिक लोक वाहतूक यंत्रणेबाबत जागरूक व्हावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यापुढेही अशा विविध उपक्रमांना आमचे कायम सहकार्य राहील.”