पुणे, दि. १२/०४/२०२३: जिल्ह्यातील विविध भागातील औद्योगिक कंपन्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांची आहे. विशेषतः कंपनी मालकांची माथाडीच्या नावाखाली होणारी लुट टाळणे, खंडणीचे प्रकार रोखण्यासाठी प्राधान्य दिले आहेत. त्याअनुषंगाने उदयोग आणि औद्योगिकनगरीत कार्यरत असलेल्या प्रतिनिधींसोबत सुसंवाद साधण्यात आला आहे. त्यांच्या सूचनांच्या आधारे कारवाईला गती देणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे.
पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या वार्षिक तपासणी आढाव्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर अधीक्षक मीतेश घट्टे, अपर अधीक्षक आनंद भोईटे उपस्थित होते.
फुलारी म्हणाले, औद्योगिक कंपन्यामध्ये शांतता प्रस्थापित करुन गुन्हेगारी संपुष्टात आणण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत माहितीचे आदान-प्रदान केले आहे. त्यांच्याकडून प्राप्त सूचनांनुसार संबंधित कंपन्यांच्या हद्दीतील पोलिस गुन्हेगारांवर कारवाईस गती देणार आहेत. त्याशिवाय कंपनी परिसरात होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठीही प्राधान्य देण्यात आले आहे. एमआयडीसी क्षेत्रात पेट्रोलिंग करणे, माथाडीच्या नावाखाली खंडणीची मागणी करणार्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारणे, चांगल्या पोलिसिंगसाठी प्रयत्न करणे, सर्वसामान्यांपासून उद्योजकांपर्यत सुरक्षिततेची जबाबदारी घेण्याचे सूचित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामीण भागात पेट्रोलिंगसाठी ६ दुचाकींचे लोकार्पण करण्यात आले.
पहिली महिला महाराष्ट्र केसरीचा सन्मान
पहिली महाराष्ट्र महिला केसरी आणि पोलीस पाल्य असलेली प्रतिक्षा रामदास बागडी हिचा पुणेरी पगडी देउन सन्मान करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तिच्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी प्रतिक्षाने आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच महाराष्ट्र केसरीचा किताब मिळविण्यापर्यंत मजल मारल्याचे सांगितले.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन