July 27, 2024

पुणे: मयत रुग्णाच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी लंपास, वानवडीतील रुबी हॉल क्लिनिकमधील घटना

पुणे, दि. १२/०४/०४/२०२३: चालताना रस्त्यावर खाली पडल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी एकाला दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्यानंतर चोरट्याने रुग्णाच्या  गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी चोरुन नेल्याची घटना २५ मार्चला वानवडीतील रुबी हॉल क्लिनिकमध्ये घडली. याप्रकरणी रुग्णालयातील वॉडबॉयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारुती किसन भालेराव (वय ३६, रा. आझादनगर, वानवडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दीपक चंदू परदेशी (वय ६० रा. वैदूवाडी, हडपसर)  यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक यांचे भाउ आकाश परदेशी हे  २५ मार्चला वानवडीतील जगतापनगर परिसरातून जात असताना चक्कर आल्यामुळे ते खाली पडले. त्यामुळे नागरिकांनी  आकाश यांना  रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर  दीपक हे रुग्णालयात पोहोचले त्यावेळी त्यांनी आकाशच्या गळ्यात सोन्याची चेन पाहिली होती. त्यानंतर डॉक्टरांना माहिती देईपर्यत मयत आकाशच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी चोरट्याने चोरुन नेली. मात्र, भावाचा अंत्यविधी करावयाचा असल्यामुळे दीपक यांनी तक्रार दिली नाही.

आकाश परदेशी यांचा अंत्यविधी उरकल्यानंतर २८ मार्चला दीपकने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन वॉर्डबॉय मारुती भालेराव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड तपास करीत आहेत.