May 18, 2024

सुप्रसिद्ध रेडीओलॉजिस्ट डॉ अरुण किनरे लिखित ‘रेडीयंट डेस्टिनी’ या आत्मवृत्ताच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन

पुणे, दि. २२ ऑक्टोबर, २०२३ : १४ अँजिओग्राफी, ५ अँजिओप्लास्टी, २ ओपन हार्ट सर्जरीज, १ कोलोस्टोमी, १ बंधमुक्त शस्त्रक्रिया, २ पेस मेकरच्या शस्त्रक्रिया, ह्दयातील बुरशी संदर्भातील १ लेझर सर्जरी, १ अर्धांगवायूचा झटका आणि सिंकोपीचे अनेक अॅटॅक्स या सर्वांना हरवून जगण्याच्या आत्मनिर्भरतेचा आणि या सर्व आजारांशी दिलेल्या झुंजीचा सुप्रसिद्ध रेडीओलॉजिस्ट डॉ अरुण किनरे यांचा रोमांचकारी प्रवास आज उलगडला…

डॉ अरुण किनरे लिखित अमेय प्रकाशन प्रकाशित ‘रेडीयंट डेस्टिनी’ या आत्मवृत्ताच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन आज सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बायोसिस विश्वभवन या ठिकाणी हा कार्यक्रम झाला.

ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ मोहन आगाशे, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर हे मान्यवर व्यासपीठावर तर सिम्बायोसिसचे संस्थापक शां ब मुजुमदार, डॉ अरुण किनरे यांच्या पत्नी स्मिता किनरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ मंदार परांजपे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. दिलीप प्रभावळकर यांनी रेडीयंट डेस्टिनी या पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन देखील केले.

यावेळी बोलताना प्रभावळकर म्हणाले, “इतके दुर्धर आजार झालेल्या व्यक्तीबद्दल मी आजवर कधी ऐकलेले नाही आणि वाचलेलेही नाही. हे सारे आजार आणि शस्त्रक्रिया निभावणारी व्यक्ती माझ्या समोर बसली आहे, मी त्यांना भेटतोय आणि त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करतोय हा माझ्यासाठी भाग्याचा आणि असामान्य असा अनुभव आहे.” डॉ अरुण यांची जगण्याची, जिंकण्याची इच्छा आणि रुग्णांची काळजी घेण्याची इच्छाशक्ती हा संपूर्ण प्रवासाच मला खूप महत्त्वाचा वाटतो. हे अनुभव विलक्षण असल्याचे प्रभावळकर यांनी नमूद केले.

वास्तवात घडणारे मिरॅकल ही उपमा आपणा ज्याला देऊ शकू अशी ही खरी गोष्ट आहे, असे सांगत डॉ आगाशे म्हणाले, “गेल्या २ वर्षांत प्रकाशित झालेली अशा पद्धतीची आपल्या आजाराची माहिती निर्भीडपणे सांगणारी ५-६ पुस्तके मला माहिती आहेत. मात्र, या पुस्तकाची दूरचित्रवाणी मालिका बनू शकेल हे मी सांगू इच्छितो.” हे सर्व सहन करत असताना, यामधून जात असताना डॉ अरुण किनरे यांचा असलेला ‘सकारात्मक अॅटिट्युड’ मला महत्त्वाचा वाटतो आणि लोकांपर्यंत जे पोहोचायला हवे ते तो पोहोचवतो असेही डॉ आगाशे यावेळी म्हणाले.

आपले आजारपण हे डॉ अरुण यांनी यांनी खूप सकारात्मकतेने घेतले. या काळात लोकांच्या सहानुभूतीपूर्व नजरा सहन करणे खूप अवघड, त्रासदायक आणि अपमानास्पद असते मात्र अरुणने हे सर्व हसत खेळत केले याचा आनंद असल्याचे मत डॉ पटेल यांनी व्यक्त केले. डॉ किनरे हे आमचे जेम्स बॉंण्ड आहेत अशी मिश्लील उपमाही डॉ पटेल यांनी त्यांना दिली.

अरुणची गोष्ट मराठीतून यायला हवी हा माझा आग्रह होता. अरुण आणि माझ्या इतर मित्रांनी जगण्याची सकारात्मक उर्जा मला दिली असे सांगत सतीश आळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दर १०-१५ दिवसांत येणारे काही ना काही आजारपण, कराव्या लागणाऱ्या चाचण्या, शस्त्रक्रिया, रुग्णालयातील मुक्काम, स्वत:च्या कामावेळी होणारा शारीरिक त्रास, परदेशात गेल्यावर त्रास झाला तर सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अडचणी, विमानप्रवासात त्रास झाल्यानंतर आलेले अनुभव अशा अनेक आठवणी डॉ अरुण किनरे यांनी कार्यक्रमात सांगितल्या तेव्हा उपस्थित प्रत्येकजण हा अवाक होऊन ऐकत होता. आपली पत्नी, मुलगा, जवळची मित्र मंडळी, डॉक्टर्स इतकेच नव्हे तर आपल्या रुग्णांचे आभार डॉ किनरे यांनी मानले. आजाराशी स्पर्धा न करता त्याच्याशी मैत्री केली असेही डॉ किनरे आवर्जून म्हणाले.

पुस्तकाचे अनुवादक संतोष शेणई आणि प्रकाशक उल्हास लाटकर हे यावेळी उपस्थित होते. गौरी गाडगीळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत आभार मानले.