April 28, 2024

पुणे: ऑनलाईन टास्कचा हव्यास पडला ३ लाखांना

पुणे, दि. २१/०७/२०२३: ऑनलाईन टास्क पुर्ण करण्यास सांगून जादा परतावा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने महिलेला तब्बल ३ लाख ६ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना ७ ते १५ मे कालावधीत बिबवेवाडीत घडली.

याप्रकरणी लावण्य, आचंल आहुजा यांच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूणा खरपणकर वय ४८ यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कुटूंबियासमवेत बिबवेवाडीत राहायला आहे. मे २०२३ मध्ये त्यांची एकासोबत ऑनलाईनरित्या मैत्री झाली होती. त्यानंतर संबंधिताने अरूणा यांना जादा परतावा देण्याच्या आमिषाने ऑनलाईन टास्क पुर्ण करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ऑनलाईनरित्या टास्क पुर्ण करण्यासाठी सायबर चोरट्याच्या सांगण्यानुसार वेळोवेळी रक्कम वर्ग केली. काही दिवसांनंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधिताला पैसे माघारी मागितले. मात्र, सायबर चोरट्याने संपर्क बंद केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे तपास करीत आहेत.