पुणे, ०५/०७/२०२३: लक्ष्मी रस्त्यावरील एका नामवंत सराफी पेढीतून हिरेजडीत दागिने खरेदी करणाऱ्या महिलेची तीन कोटी ४८ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सराफी पेढीतील कर्मचाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जास्त किंमत लावून महिलेची दागिने खरेदी व्यवहारात फसवणूक केली असून या प्रकरणी एका कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी सराफी पेढीतील कर्मचारी चेतन विसपुते याला अटक करण्यात आली असून, संगीता महाजन, तेजल पवार, अमोल मोहिते, सागर धोंडे, चंदन गुप्ता, धवल मेहता, हितेश पुनमिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४६ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला लोणी काळभोर भागात राहायला आहे. महिलेच्या पतीचा पेट्रोल पंप, तसेच अन्य व्यवसाय आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील एका नामवंत सराफी पेढीतून त्या ग्राहक आहेत. डिसेंबर २०१८ पासून त्यांनी सराफी पेढीतून वेळोवेळी चार कोटी १९ लाख रुपयांचे हिरेजडीत दागिने खरेदी केले.
महिलेने दागिने खरेदीवर सूट मागितली हाेती. नियमित ग्राहक असल्याने महिलेला खरेदीवर सूटही देण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये महिला सराफी पेढीत गेली. जुने हिरेजडीत दागिने बदलायचे आहेत, असे तिने सांगितले. तेव्हा टाळाटाळ करण्यात आली होती. सराफी पेढीतील कर्मचारी (सेल्समन) चेतन विसपुते याच्याशी महिलेने संपर्क साधला. तेव्हा त्याने महिलेला प्रतिसाद दिला नाही. विसपुते याची सराफी पेढीच्या दुसऱ्या शाखेत बदली झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महिलेला संशय आला. त्यानंतर महिला हिरेजडीत दागिने घेऊन सराफी पेढीच्या दुसऱ्या शाखेत गेली. तेव्हा महिलेकडे असलेले हिरेजडीत दागिन्यांची गुणवत्ता (कॅरेट) कमी असल्याचे सांगण्यात आले.
महिलेला जादा रक्कमेची बिले देऊन तीन कोटी ४८ लाख ८५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. बिलांवर सराफी पेढीचे शिक्के मारण्यात आले होते. महिलेच्या तक्रारीनंतर सराफी पेढीतल व्यवस्थापक, रोखपाल, विपणन व्यवस्थापक, कर्मचारी, तसेच मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर तपास करत आहेत.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.