December 14, 2024

पुणे: ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने तरुणीची सात लाखांची फसवणूक

पुणे, ०५/०७/२०२३: समाजमाध्यमातील जाहिराती, ध्वनिचित्रफितीस दर्शक पसंती मिळून देणे, तसेच घरबसल्या कामाच्या आमिषाने (ऑनलाइन टास्क) फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. चोरट्यांनी एका तरुणीची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका तरुणीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार निराली शर्मा, ऋत्विक सिंग, जगदीश पुरी यांच्याविरुद्ध फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी तरुणीला समाजमाध्यमातून संदेश पाठविला होता. एका खासगी कंपनीचे विपणनाचे काम आहे. घरातून काम करण्याची संधी उपलब्ध असून चोरट्यांनी तरुणीला आमिष दाखविले.

तरुणीला सुरुवातीला आरोपींनी ऑनलाइन पद्धतीने काही पैसे दिले. त्यानंतर बतावणी करुन आरोपींनी वेळोवळी सात लाख १६ हजार रुपये उकळले. तरुणीला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली.