May 3, 2024

पुणे: तीन हजारांच्या व्यवहारातून आयटी इंजिनिअर तरुणाची हत्या..! लोणीकंद पोलिसांनी मारेकऱ्याला ठोकल्या बेड्या

पुणे, १४/०५/२०२३: आयटी इंजिनिअर तरुणाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, तीन हजारांच्या व्यवहारातून त्याचा गळा कापून निर्घुन हत्या करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. लोणीकंद पोलिसांनी २४ तासात गुन्हा उघड करत मारेकऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

 

भगवान केंद्रे (वय २३, रा. परतापूर, ता. कळंब, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेत गौरव सुरेश उरावी (वय ३५, रा. खराडी, मूळ रा. शिवाजीनगर, अमरावती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लोहगाव भावडी रस्त्यावरील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी रक्ताच्या थारोळ्याततरुणाचा मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तरुणाची दुचाकी त्याचठिकाणी पार्क केलेली होती. तपासात तो गौरव उरावी असल्याचे समजले. गौरव खराडी येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीस होता. तो खराडी भागातील एका सोसायटीत मित्रांसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास गौरव जेवायला जातो, असे मित्रांना सांगून बाहेर पडला. मात्र, तो रात्री उशीरापर्यंत परतला नाही.

वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारूती पाटील व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला असताना हा खून भगवान याने केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने त्याला कळंब तालुक्यातील परतापूर येथून पकडले. चौकशीत भगवान पुण्यात ओला-उबेर गाडी चालवत होता. गौरवने त्याची गाडी दोन वेळा बुक केली होती. त्यातून त्यांची ओळख झाली होती. गाडी तत्काळ मिळावी, यासाठी त्याने भगवान याचा क्रमांक घेतलेला होता. त्यानंतर गौरवने त्याच्या कारमधून प्रवास केला. त्या व्यवहारात गौरवकडे भगवान याचे तीन हजार रुपये होते. पण, काही कारणास्तव गौरवला पैसे देण्यास वेळ लागला होता. त्यावरूनच शुक्रवारी भगवान याने त्याला बोलावून घेतले होते. तिघेजन डोंगर पायथ्याशी गेले. त्याठिकाणी त्यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी भगवान याने त्याच्या खून केला.