July 25, 2024

पुणे: वाघोलीत संगणक अभियंता तरुणाचा खून

पुणे, १३/०५/२०२३: नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील अभियंता तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

गौरव सुरेश उरावी (वय ३५,रा. खराडी, मूळ रा. शिवाजीनगर, अमरावती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वाघोलीनजीक लोहगाव भावडी रस्त्यावर डोंगराच्या पायथ्याजवळ एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा गौरव याच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव खराडी येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीस होता. तो खराडी परिसरातील एका सोसायटीत मित्रांसोबत राहत होता. शुक्रवारी (१२ मे) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गौरव जेवायला जातो, असे मित्रांना सांगून बाहेर पडला. मात्र, तो रात्री उशीरापर्यंत परतला नाही. लोहगाव- भावडी रस्त्यावर त्याचा मृतदेह शनिवारी सापडला. गौरवच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. लोणीकंद पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.