पुणे, २६/०४/२०२३: किरकोळ वादातून भर रस्त्यात चाकुने भोसकून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झटापटीत आरोपी जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अहमद रजा खान (वय २१ रा. युनिटी पार्क, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सलीम इब्राहिम खान (वय ४९ रा. नवाजीश चौक, कोंढवा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमद खान याचा भाऊ सलमान फारुख खान (वय २३) याने या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झटापटीत आरोपी सलीम खान जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली.
अहमद रजा खान मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कोंढव्यातील गरीब नवाज हाॅस्पिटलसमोरुन निघाला होता. त्या वेळी सलीम खान याने अहमदकडे बघून शिवीगाळ केली. शिवीगाळ का केली, अशी विचारणा अहमदने आरोपी सलीमकडे केली. अहमदने त्याच्याकडील चाकू उगारुन त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आरोपी सलीमने अहमदकडील चाकू हिसकावून घेतला. अहमदला चाकुने भोसकले. गंभीर जखमी झालेल्या अहमदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक आर. एस. मोहिते तपास करत आहेत.
दरम्यान, गेल्या दाेन दिवसात शहरात चार खून झाले आहेत. खडकीतील दारूगोळा कारखान्यासमोर एकतर्फी प्रेमातून एका महिलेचा खून करण्यात आला होता. मांजरी भागात एका महिलेवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन तिचा मृतदेह विहीरीत टाकून दिल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता. सोमवारी आईवरुन शिवीगाळ केल्याने कोंढव्यातील पिसोळी भागात एका ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्याची घटना घडली होती.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.