October 14, 2024

पुणे: भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीचा मृत्यू, नगर रस्त्यावर अपघात

पुणे, २६/०४/२०२३: नगर रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीवरील निवृत्त पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीचाी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेले दाम्पत्य शहरातील कसबा पेठेत राहायला होते. शेतीच्या कामासाठी ते गावी जात असताना दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक देऊन डंपरचालक पसार झाला.

अशोक मार्तंड काळे आणि त्यांची पत्नी वर्षा (दोघे रा. कसबा पेठ) अशी मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. अशोक काळे निवृत्त पोलीस कर्मचारी आहे. काळे यांची दौंड तालुक्यातील राहु गावाजवळ वाळकी येथे शेती आहे. शेतीच्या कामासाठी काळे दाम्पत्य बुधवारी (२६ एप्रिल) दुपारी एकच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाले होते. नगर रस्त्यावरील वाघोलीजवळ केसनंद फाटा येथे दुचाकीस्वार काळे दाम्पत्य वळत होते. त्या वेळी भरघाव वेगाने निघालेल्या डंपरने दुचाकीस्वार काळे दाम्पत्याला धडक दिले. अपघातानंतर काळे दाम्पत्याला डंपरने फरफटत नेले. काळे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक भास्कर पंढरीनाथ कंद डंपर घटनास्थळी सोडून पसार झाला.

अपघातानंतर नगर रस्त्यावरील केसनंद फाटा चौकात काही वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तसेच लोणीकंद पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. अपघातात काळे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला होता.

केसनंद फाटा चौकात सिग्नल आहे. चौकात वाहनांचा वेग कमी होतो. नगर रस्त्यावरुन अवजड वाहने भरधाव वेगाने जातात. भरधाव वेगामुळे गजबलेल्या वाघोली परिसरात अपघात घडतात. वाघोली परिसराचा समावेश पुणे महापालिकेत झाला असून या भागातील लोकसंख्या वाढली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या अवजड वाहनचालकांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने या भागात कायम गंभीर अपघात घडतात, अशा तक्रारी वाघोली भागातील रहिवाशांनी केल्या.