February 28, 2024

पुणे: छेडछाड झाल्याचा तरूणीचा मेसेज… अन काही तासांत आरोपीला बेड्या

पुणे, दि. १४/०७/२०२३: आम्ही दोघी मैत्रिणी सेनापती बापट रस्त्याने पायी चाललो होतो. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एकाने गाडी थांबवून मला चक्कर येत आहे, कृपया तुम्ही मला गाडीवर घरी सोडाल का, अशी विनंती केली. मानवतेच्या दृष्टीकोनातून मी त्याच्या दुचाकीवर बसून ड्रायव्हिंग करीत घरी सोडवित होते. त्याचवेळी त्याने माझ्यासोबत विकृत चाळे करण्यास सुरुवात केली. मदत मागून माझा विनयभंग झाला आहे, मला न्याय द्या. असा मेजेस तरुणीने व्हॉटसअ‍ॅपद्वारे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मोबाइलवर केला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तातडीने दखल घेत काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तक्रारदार तरुणीने पुणे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

अनुप प्रकाश वाणी (वय ४४, रा. ७५३ , सदाशिव पेठ ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ६ जुुलैला रात्री दहाच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी १७ वर्षीय तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

महिलांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभुमीवर पुणे पोलिसांकडून ठोस पावले उचलली जात आहेत. विशेषतः पोलिस आयुक्तांनी नागरिकांसह महिलांना त्यांच्या तक्रारी आणि सूचनांसाठी नवीन व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देउन मेसेज करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून त्याव्दारे अनेक तक्रारीही पोलिसांना प्राप्त होत आहेत. त्यानुसार कारवाईचा बडगा उगारला जात आहे. दरम्यान, फिर्यादी तरुणी आणि तिची मैत्रिणी ६ जुलैला रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या एकाने मुलींना आजारी असल्याचा बहाणा केला. मला चक्कर येत आहे, कृपया तुम्ही मला गाडीवर घरी सोडाल का, अशी विनंती केली. त्यामुळे तरुणीने त्याच्या दुचाकीवर बसून घरी ड्रायव्हिंगला प्राधान्य दिले. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर पाठीमागे बसलेल्या आरोपीने तरुणीसोबत विकृत चाळे करण्यास सुरुवात केली.

तरूणाचा विक्षप्तपणा लक्षात आल्यानंतर तरुणीने गाडी थांबवून त्याठिकाणाहून पळ काढला. घटनेमुळे संबंधित तरुणी प्रचंड घाबरलेली होती. अशातच पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी व्हॉटसअ‍ॅप मेसेज उपक्रमाची सुरूवात केली होती. त्यानुसार संबंधित क्रमांकावर तरुणीने बेतलेल्या प्रसंगाचा मेसेज व्हॉटसअ‍ॅपवर केला. मेसेज मिळताच चतुःशृंगी पोलिसांना तिच्याकडून इत्भूंत माहिती घेउन तपासाला गती दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दुचाकी क्रमांकावरुन आरोपीचा माग काढून त्याला अटक केली. अनुप वाणी असे त्याचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्यामुळे फिर्यादी तरुणीने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करीत धन्यावाद दिले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त शशिकांत बोराटे, वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, उपनिरीक्षक रूपेश चाळके, श्रीकांत वाघवले, आशिष निमसे, बाबुलाल तांदळे यांनी केली.